सत्सेवेचे महत्त्व

शनिवार, 28 मार्च 2015 (11:12 IST)
प्रभू श्रीराम रावणाच्या कह्यातून सीतेला सोडवण्यासाठी लंकेला निघाले. त्यावेळी वाटेत समुद्र होता. हा समुद्र ओलांडून त्यांना लंकेला जायचे होते. समुद्रावरून कसे लंकेला जाणार? मग वानरसेना आणि मारुतीने ठरवले की, आपण समुद्रात दगड टाकून सेतू बांधूया आणि त्याच्यावरून चालत आपण लंकेला जाऊया. प्रत्येक जण श्रीरामाचा नामजप दगडावर लिहून नामस्मरण करत समुद्रात दगड टाकू लागले. तर काय आश्चर्य! ते दगड पाण्यावर तरंगू लागले आणि सेतू सिद्ध झाला. 
 
जेव्हा सगळे वानर सेतू बांधत होते, तेव्हा त्यांना एका छोटय़ाशा खारुताईने बघितले. ती मनात म्हणाली, ‘श्रीराम तर देवच आहे. त्याच्या कामासाठी हे वानर पूल बांधत आहेत. मग मीपण त्यांना साहाय्य करते. ही तर श्रीरामाची सेवा आहे.’ मग ती जवळच्या एका वाळूच्या ढिगार्‍यावर गेली आणि तिच्या हातून छोटय़ाशा हातात छोटे दगड आणि वाळू घेऊन समुद्रात नेऊन टाकू लागली. हे बघून वानरांना आश्चर्य वाटले. एका वानराने तिला म्हटले, ‘ए चिमुरडे, तू कण कण वाळू आणून टाकतेस. त्याने काय सेतू बांधून होणार आहे का? तेव्हा खारूताई म्हणाली, ‘वानरदादा, मी मोठे दगड नेऊ शकत नाही. तुमच्यासारखा सेतू बांधू शकत नाही; पण मी माझा खारीचा वाटा तरी उचलते. माझ्याकडून श्रीरामाची सेवा होऊ दे. छोटी असली, तरी चालेल.’ असे म्हणत खारुताई परत वाळू घेऊन समुद्रात टाकण्याची सेवा करू लागली. असे बराच वेळ केल्यावर ती दमली; पण तरी न थांबता तिच्या खेपा चालूच होत्या. ती मनात काय म्हणत होती, ते ठाऊक आहे? ती म्हणत होती, ‘माझ्या अंगात जोपर्यंत शक्ती शिल्लक आहे, तोपर्यंत मी श्रीरामाची
 
सेवाच करत राहाणार. पुन्हा वाळू घेऊन समुद्राकडे जातांना तिच्याकडे कोणीतरी प्रेमाने बघितले, कोण होते ते सांगा? प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाने तिला बघितले आणि खारुताईला हातात उचलले. श्रीराम तिला म्हणाला, खारुताई तू छोटी आहेस; पण फार चांगली सेवा केलीस. तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे. श्रीरामाने आपल्या उजव्या हाताच्या तीन बोटांनी खारुताईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तेव्हा खारुताईच्या पाठीवर देवाच्या बोटांचे ठसे उमटले. बघा, आपल्याला खारीच्या पाठीवर ठसे दिसतात की नाही. 
 
मुलांनो, सेवा म्हणजे काय, तर देवाला आवडेल असे काम करणे, चांगल कार्यात आपण सहभागी होणे, म्हणजेच देवाची सेवा. आईला कामात साहाय्य केलेले आवडेल की. 

वेबदुनिया वर वाचा