वडापावाइतकेच अविभाज्य सचिन- विनोद

NDND
सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळीच्या मैत्रीने शालेय जीवनातील स्पर्धा ते आंतरराष्ट्रीय मैदानापर्यंतचा प्रवास केला आहे. आजही त्यांची मैत्री कायम आहे. भारतीय फलंदाजीतील हे दोन भिन्न प्रवाह. आयुष्याच्या एका क्षणी ते एकत्र आले. वाढले. एकमेकांत मिसळून गेले. कारकिर्दीत आज एकत्र नसले तरी परस्पर स्नेहाचा ओलावा ह्रदयात जपत आपापल्या मार्गाने त्यांची वाटचाल सुरू आहे.

दोघांचे मार्ग सुरवातीपासून भिन्न. एकाचा प्रवास गरिबी, कष्ट, अतृप्ती, निराशा, संघर्ष व बंड या मार्गाने झालेला. तर दुसर्‍याचा सुख, समाधान, संतोष आणि शिस्तबद्ध असा. मात्र, दोघांमधील साम्य एकच- खेळाप्रती असीम निष्ठा व भक्ती.

सचिन व विनोदची पहिली भेट लहानपणीच शारदाश्रमात झाली. त्यावेळी सचिन दह तर विनोद होता अकरा वर्षाचा. शारदाश्रमाकडून सेंट झेवियर्सविरूद्ध दोघांनी १९८८ मध्ये जागतिक विक्रम नोंदवणारी 664 धावांची भागीदारी रचली. दोघांचे मैत्र तेव्हापासून जुळले ते कायमचेच. ‍शिवाजी पार्कवर प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सराव केला की वडा-पावची मेजवानी ठरलेलीच.

त्यांच्या मैत्रीचा धागा वडापावशी तेव्हापासून जोडला गेला तोही कायमचाच. एकाने शतक ठोकलं की दुसर्‍याने वडा-पावची पार्टी देऊन सेलिब्रेट करायचे. लहान वयातच मैत्र जुळल्याने त्यांच्या मैत्रीत असूयेला शिरकाव करायला फटच सापडली नाही. १९८९ मध्ये सचिनची पाक दौर्‍यासाठी भारतीय संघात निवड झाली. दोघेही हर्षोर्ल्हासाने बेभान झाले. मित्राच्या आनंदात आनंद शोधण्याचा मोठेपणा त्यांच्यात तेव्हापासूनच भिनला.

IFMIFM
सचिनच्या निवडीनंतर वृत्तपत्रांमध्ये जागतिक भागीदारीतील दुसरा सवंगडी कुठाय? या आशयाचे वृत्त, लेख प्रकाशित झाले. त्याच वर्षी सचिनपाठोपाठ विनोदनेही भारतीय संघात प्रवेश केला. विनोदच्या कारकिर्दीची सुरवात संथ झाली. पण 224 धावांची द्विशतकी खेळी करून इंग्लंडविरूद्ध सवौच्च धावसंख्या उभारणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू बनला. त्यानंतर त्याने अनेक अविस्मरणी खेळी केल्या. अव्वल गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. जागतिक कीर्तीच्या शेन वार्नला फोडून काढणारा पहिला भारतीय तोच.

सचिन आणि विनोद या दोघांच्याही प्रवृती व स्वभावात कमालीची भिन्नता. सचिन शांत, संयमी, नम्र व शिस्तबद्ध तर विनोद अस्थिर, खळाळत राहणारा, उथळ आणि बेदरकारही. विनोदच्या जीवनाची वाट चढउतार युक्त. वादाची वादळे तर कायमचीच त्याच्याभोवती घोंघावणारी. १९९३ मध्ये झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेसाठी पुण्यात असताना हॉटेल ब्ल्यू डायमंडमध्ये नोएला नावांच्या सुंदर युवतीशी विनोदची गाठ पडली आणि 'लव्ह एट फ्रर्स्ट साइट' झाले. चार महिन्यात विवाहही झाला. मैदानावर खेळ मात्र, इतर वेळेस मौज-मजा करण्यात वाईट काय? असे त्याचे मत. फॅशन, स्टाइलचा तो सुरूवातीपासूनच चाहता. त्यामुळे त्याच्यासंदर्भातील वादात त्याच्या स्टाईलही वादाच्याच विषय ठरल्या.

सचिनच्या बाबतीत असे काही झाले नाही. वाद त्याला सहसा स्पर्शला नाही. दोघांमधील सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमीचाही हा परिणाम असावा. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर हे मराठीचे प्राध्यापक व साहित्यिक. महानगरातील
मध्यमवर्गीय धाटणीच्या वांद्रयात त्यांचे वास्तव्य. तर विनोदचे वडील गणपत कांबळी जेस्कीन विलियम कंपनीत नोकरीस. मुस्लिमबहूल भिंडी बाजार भागातील चाळीत विनोदचे बालपण गेले. दोघांनीही भारतीय क्रिकेटमधील प्रवेशाची खडतर वाट निश्चयाने व संघर्षाने पार केलेली. विनोदला मात्र जीवनसंर्घषातूनही तावून सुलाखून निघावे लागले.

घरापासून शाळेपर्यंत व तेथून खेळाच्या मैदानावर जाण्यासाठी विनोदकडे पैसे नसायचे. त्याच्या प्रवास खर्चाची जबाबदारी उचलली ती आचरेकर सरांनी. शाळेची फी भरली ती वर्गशिक्षिकेने. पुढे विक्रमी भागीदारीनंतर सचिन व त्यास दोघांनाही प्रायोजक मिळाल्याने तो संघर्ष एकदाचा थांबला.

सचिन व विनोदच्या कारकिर्दीने आंतरराष्ट्रीय वाट पकडली तरीही शालेय जीवनापासूनच्या मैत्राची वीण मात्र घट्ट राहिली. सचिन ओव्हलवर शंभरावा कसोटी सामना खळत असताना विनोद मित्रास शुभेच्छा देण्यास विसरला नाही. येथेही त्याने त्याला शंभर वडा-पावची भेट दिली. सचिनने गावसकरच्या 35 कसोटी शतकांची बरोबरी केल्यावर आयोजित मेजवानीत विनोद प्रमुख पाहुणा होता. यावेळेस कोणती भेट दिली असेल? ... बरोबर पस्तीस वडापावची.

सचिनच्या धावा वाढत जातील तशी वडापावच्या संख्येतही वाढ होत राहील. अन त्यांच्या मैत्रीची वीण अधिक घट्ट होत राहिल.