कोल्हापूर हे कलाकारांचे शहर. या शहराने अनेक कलावंत चित्रपटसृष्टीला दिले. रमेश देव हे त्यातीलच एक. त्यांच्याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही, एवढे मोठे योगदान त्यांचे आहे. एक काळ तर असा होता, की रमेश आणि त्यांची पत्नी सीमा देव चित्रपटात असतील तर तो हीट होणार अशी खात्री असायची.
रमेश देव यांनी नायकाच्या भूमिका केल्याच, पण ते उठून दिसले ते खलनायकी भूमिकेत. 'भिंगरी' चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले.
तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या. निर्माता, दिग्दर्शक अशा विविध प्रांतातही ठसा उमटवला. त्याचा 'सर्जा' हा ऐताहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट चांगलाच गाजला.
अनेक हिंदी चित्रपटातही त्यांनी उत्तमोत्तम भूमिका केल्या. ऋषीकेश मुखर्जींच्या 'आनंद' चित्रपटात राजेश खन्नाचा डॉक्टर मित्र खरोखरीच मनापासून रंगवला. त्यांच्या या भूमिकेला दादही मिळाली. रमेश देव या व्यक्तीमध्ये उत्कृष्ट नायक होण्यासाठी लागणारे सौदर्य, मेहनत, अभिनय कौशल्य अशा सर्वच गोष्टी होत्या.
जिद्द व मेहनतीच्या भरवशावर अभिनेता म्हणून प्रस्थापित होवून त्यांनी एकाहून एक सरस चित्रपट दिले व आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळविले.
रमेश देव अभिनित चित्रपट :
देवघर भिंगरी भैरवी आधी कळस मग पाया बाप माझा ब्रम्हचारी एक धागा सुखाचा क्षण आला भाग्याचा प्रेम आंधळ असतं सोनियाची पाऊले आंधळा मागतो एक डोळा येरे माझ्या मागल्या आलिया भोगासी आई मला क्षमा कर राम राम पाव्हण अवघाची संसार पसंत आहे मुलगी यंदा कर्तव्य आहे सात जन्माचे सोबती जगाच्या पाठीवर आलय दर्याला तुफान दोस्त असावा असा