चित्रपट परीक्षण : 'पिप्सी' बालविश्वाचा रंजक अनुभव

शनिवार, 28 जुलै 2018 (12:48 IST)
लहान मुलांच्या निरागस बालविश्वाचा पुरेपूर वापर आपल्याकडच्या सिनेमात केला जात नाही. तो केला, तर अनेक अनोख्या कल्पना, आपल्याला गवसू शकतात आणि छोट्यांच्या कल्पनेतली एक वेगळीच भावसृष्टी साकारू शकते. 'पिप्सी' सिनेमा पाहताना तसंच होतं. 'पिप्सी'ची गोष्ट निव्वळ चानी (मैथिली पटवर्धन) आणि तिचा मित्र बाळा (साहिल जोशी) या दोघांची किंवा त्यांच्या मैत्रीपुरतीच मर्यादित राहत नाही, ती गोष्ट अखिल बालविश्वाची होऊन जाते. कारण लहान वयात आई किंवा बाबा आजारी पडलेले असताना, ते लवकर बरे व्हावेत म्हणून अनेकानेक शक्कल प्रत्येकानेच लढवलेल्या असतात. फक्त  प्रत्येकानेच त्या आपल्या मनात खोलवर दडवून ठेवलेल्या असतात. चानीची आणि बाळ्याची गोष्ट भावते ती यामुळेच. खरंतर ही गोष्ट लहानग्या चानीचीच. पण बाळ्या तिच्या बालविश्वाचा अविभाज्य भाग असल्यामुळे चानीची गोष्ट त्याचीही होऊन जाते.
सिनेमाचा जीव खरंतर अगदी छोटा आहे. चानीची आई आजारी असते आणि ती जास्तीत जास्त तीन महिने जगेल, असं डॉक्टर चानीच्या वडिलांना सांगतात. ते वाक्य चानी ऐकते आणि गळाठून जाते. मग आईचा जीव वाचावा, यासाठी काय करता येईल, याच्या विचारात असताना तिच्या डोक्यात येतं-गोष्टीतल्या राक्षसाचा जीव पोपटात असतो, तसा आईचा जीव माशात असेल का? ती ही कल्पना बाळ्याला सांगते आणि मग सुरू होतो, आईचा जीव असलेल्या माशाचा शोध. आता नदी-तलाव-विहिरीतल्या एवढ्या माशांमधून नेमका हा मासा शोधायचा कसा?... तर एके दिवशी चानीच्या घरी रांधण्यासाठी मासे आणलेले असतात. त्यातला एक मासा जिवंत असतो. पाण्याविना तो तडफडत असतो... आणि चानीला त्यात आपल्या आईचा जीव दिसतो. ती लगेच त्याला उचलून ग्लासातल्या पाण्यात टाकते. तिथून चानी आणि बाळ्याचा हा मासा जगवण्याचा आटापिटा सुरू होतो. तो मासा बाटलीतल्या पिप्सीसारखाच काळा नि गोड असल्यामुळे ते त्याचं नाव ठेवतात-पिप्सी. 
आता हा पिप्सी जगतो का आणि चानीच्या आईचं नेमकं काय होतं... हे कळण्यासाठी थिएटरमध्ये जाऊन सिनेमाच पाहावा लागेल. अर्थात तो पाहायला काहीच हरकत नाही. तुम्ही तुमच्याही नकळत एका बालविश्वाचा भाग होऊन जाल... अन् तरीही हा सिनेमा आहे त्यापेक्षा अधिक चांगला होऊ शकला असता, असं वाटत राहतं.
 
निर्मितीसंस्था - लँडमार्क फिल्म्स 
लेखक - सौरभ भावे 
दिग्दर्शक - रोहन देशपांडे 
छायाचित्रण - दिवंगत अविराम मिश्रा 
संगीत - देबार्पितो 
गीत - ओमकार कुलकर्णी 
कलाकार - मैथिली पटवर्धन, साहिल जोशी, अजय जाधव, अतुल महाले, अभिलाषा पाटील, पूजा नायक 
 
दर्जा - तीन स्टार 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती