चैत्रगौर... एक पारंपरिक सोहळा

शुक्रवार, 27 मार्च 2020 (07:14 IST)
मराठमोळ्या स्त्रियां चैत्र महिन्यात हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीये पासून चैत्रगौर बसवतात. देवीला झोपाळ्यात बसवून संपूर्ण महिनाभर म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीया (अक्षय तृतीया) पर्यंत गौरीची स्थापना करून पूजा करतात. 
 
गौर म्हणजे देवी पार्वतीची पूजा केली जाते. स्त्रिया आपापल्याघरी हा सोहळा साजरा करतात. एका छोट्याश्या पाळण्यात गौर (अन्नपूर्णा) स्थापित करतात. 
 
महिन्याभरातील कुठल्याही एका दिवशी सुवासिनींना जेवायला बोलवतात. संध्याकाळी हळदी-कुंकूवाचा थाट करतात. या दिवशी गौरीच्या ओवती-भोवती साज सज्जा करतात.
 
कोकणात तर घरी आलेल्या सुवासीनी आणि कुमारिकेचे पाय धुवून त्यांचा हातावर चंदनाचे लेप लावतात. त्यांची भिजवलेले हरभरे आणि फळांनी त्यांची ओटी भरतात. कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ खायला देतात. "गौरीचे माहेर" गाणे गातात. ही पद्धत फक्त कोकणातच दिसते. 
 
महाराष्ट्रात तर गौरीचे हळदी-कुंकू करताना गौरी पुढे 
सुंदर अशी आरास मांडली जाते. या महिन्यात गौर आपल्या माहेरी येते अशी आख्यायिका आहे. 
 
कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ, बत्तासे, कलिंगड, काकडी, कैरीचे पन्हे, भिजवलेले हरभरे असा नैवेद्य देवीस अर्पण केला जातो. घराच्या अंगणात चैत्रांगण काढले जाते. 
 
भारतात चेत्रगौर अन्यत्र प्रांतात पण साजरी केले जाते. 
 
कर्नाटक- चैत्रगौर ही कर्नाटकातही मांडली जाते. गौरीचे पूजन करून सुवासिनींची भिजवलेल्या हरभऱ्याने ओटी भरतात. 
 
राजस्थान - या प्रांतात होळीच्या दुसऱ्या दिवशी चैत्र महिना सुरु होतो. त्या दिवशी गणगौर बसवितात. होळीची 
राख आणि शेणाचे 16 मुटके करतात. भिंतीवर 16 हळद आणि 16 कुंकुवाच्या टिकल्या काढतात. त्याखाली मुटके मांडले जाते. हे मुटकेचं गौरीचे प्रतीक होय. गव्हाच्या ओंब्या, हळदीने याची पूजा करतात. ज्वारीच्या कणसाला पांढरा दोरा बांधून गौरीच्या मुटक्या जवळ कणसे ठेवली जाते. हे कणसे म्हणजे शंकराचे प्रतीक असे. एका कणसाला लाल पिवळा दोरा आणि केसांचा गुंता बांधला जातो. हे गौरीचे प्रतीक मानले जाते. या गौरीला चुरमा आणि लिंबाच्या डहाळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती