'कमीज' व 'वेस्टर्न वेअर'मधला टॉप म्हणजे 'कुर्ता'!

‘कुर्ती’ ही एक सेतू आहे - ‘कमीज’ व ‘वेस्टर्न वेअर’मधल्या ‘टॉप’मधली... म्हणजेच ती एक ‘पर्फेक्ट ब्लेंड’ दोन्हींतल्या हव्याहव्याशा वाटणार्‍या सर्व गोष्टींचे! ज्या कोणी स्त्रिया वेस्टर्न वेअर घालू शकत नाहीत (कारणे कुठलीही का असेनात), मात्र ज्यांना सलवार-कमीज वगैरेच्या पारंपरिक चौकटीच्या बाहेरचे काही हवेहवेसे वाटतेय-त्यांच्यासाठीच या प्रकाराने आपल्याकडे जन्म घेतला असावा... त्याचप्रमाणे ज्यांना वेस्टर्न वेअरच्या सुटसुटीतपणाची सवय आहे व ती यत्किंचितही कमी न करता काही तरी परिधान करायचेय (करावे लागतेय!) त्यांच्यासाठी हे वरदानच.

कुर्ती वेगवेगळ्या प्रकारे घालता येते कॅज्युअल, ऑफिस वेअर व ‘ओकेजनल’ (लग्न, पार्टी वेअर इ.) ही लांबीला अर्थातच साधारणपणे मांड्यांपर्यंतच असते. कॅज्युअल कुर्ती ही कॉटन, शिफॉन, जॉर्जेट इ. मध्ये प्रिंटेड वा शेडेड मटिरियल्समध्ये उपलब्ध आहेत. त्यात एम्ब्रॉयडरी वर्क (हलकेसेच केले तरी चालेल) किंवा एम्ब्रॉयडरी बॉर्डर्स वा टेप्स लावून स्टाइल केलेले असावे. या कुर्तीज सहसा ए लाइनच्या अथवा फ्लेअर्ड किंवा फ्रॉक स्टाइलच्या छान. ‘प्रिन्सेस कट’ वा ‘कली’ टाइप ही लोकप्रिय होताहेत. स्लीव्हलेसपासून पफ स्लीव्हज, थ्री-फोर्थ किंवा बेल-स्लीव्हज्, सब कुछ बहुत अच्छे!

‘फॉर्मल’ खास करून ‘ऑफिस वेअर’ म्हणून हवे असल्यास चांगल्या क्वालिटीचे जरा जाडसर साउथ कॉटन किंवा सिल्क, मोजकीच पण ‘रिच’ एम्ब्रॉयडरी, स्टँड कॉलर, शॉर्ट स्लीव्हज ते थ्री-फोर्थ ते फुल-आॅल इज वेल... रंग सोबर, रिच-मरून, डार्क पर्पल, रस्ट इ.

‘ऑकेजनल’ वेअर म्हणून असलेल्या कुर्तीजमध्ये सर्व प्रकारची मटेरिअल्स आपण वापरू शकतो, खास करून यांचा एकत्र/मिलाफ असलेला खूपच दिसतोय. म्हणजे मेन बॉडीसाठी जर ब्लॅक शिमर असेल तर त्याच्या योकसाठी थिन/स्ट्राइप्ड काळे/राखी वा चंदेरी कापड असते. योकची बॉर्डर गोट लावून केलेली असते, स्लीव्हज नेटच्या असतात. त्यांना बॉर्डरला टिकली-काम असते व हेम-लाइन ही अन्य को-ऑर्डिनेटिंग कापडाची ‘प्लीटेड’ करून लावलेली असते.

वेबदुनिया वर वाचा