मराठी भाषा दिन : मराठी भाषेचं फारसी कनेक्शन असं आहे

शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (15:01 IST)
किल्ला, जहाज आणि दरवाजा... खुर्ची, कागद आणि दुकान... नजर, साल आणि फक्त..
हे शब्द कुठल्या भाषेतले आहेत? आज मराठीत सर्सास वापरले जात असले, तरी हे सगळे शब्द मूळचे मराठी नाहीत, असं सांगितलं तर?
 
हे सगळे शब्द फारसी भाषेतून आले आहेत आणि मराठीनं ते आपलेसे केले आहेत. आजच्या काळात इराणची अधिकृत भाषा असलेली फारसी ही महाराष्ट्रात अनेक शतकं व्यवहाराची भाषा बनली होती.
 
आजही आपल्या रोजच्या वापरातल्या मराठीमध्ये या भाषेच्या पाऊलखुणा दिसतात. मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आम्ही त्याच पाऊलखुणांचा मागोवा घेतो आहोत.
 
फारसी-मराठीचं नातं कसं जुळलं?
मराठी आणि फारसीचा संबंध अगदी जुना आहे. या दोन्ही एकमेकींच्या दूरच्या मावसबहिणी आहेत असं म्हणायलाही हरकत नाही.
 
भाषाविज्ञानाचे प्राध्यापक चिन्मय धारुरकर त्याविषयी अधिक माहिती देतात.
 
"फारसी आणि मराठी या एकाच मोठ्या कुळातल्या भाषा आहेत. इंडो युरोपियन लँग्वेज फॅमिली म्हणजे युरो-भारतीय भाषा कूळ असं त्याचं नाव. या दोन्ही भाषांचं उपकूळही एकच आहे जे इंडो-इराणी म्हणून ओळखलं जातं.
 
"त्यामुळे आपोआपच वाक्यरचनेच्या पातळीवर किंवा काही मूलभूत शब्दसंग्रह आणि संरचनांच्या बाबतीत फारसी आणि मराठीमध्ये साम्य आढळून येतं. दुसरं म्हणजे फारसी भाषेत साठ टक्के शब्द अरबी भाषेतले आहेत. म्हणजे फारसीवाटे ते मराठीत आले आहेत."
 
मुस्लिम राजवटीमुळे फारसी महाराष्ट्रात आली, असं ढोबळमानाने अनेकांना वाटतं. पण ते पूर्णपणे खरं नसल्याचं ज्येष्ठ लेखक आणि संतसाहित्याचे अभ्यासक यू. म. पठाण यांनी म्हटलं आहे.
 
पठाण यांनी मराठी बखरींमध्ये वापरलेल्या फारसी भाषेवर संशोधन केलं होतं. 1958 साली पुणे विद्यापीठात त्यांनी सादर केलेला शोधनिबंध म्हणजे फारसी आणि मराठीला जोडणाऱ्या दुव्यांचा खजिनाच आहे.
 
त्यांच्या मते फारसीचे मराठीशी भाषिक संबंध पूर्वापार चालत आले आहेत आणि मुसलमानी राजवटीत ते अधिक घनिष्ठ झाले आहेत. बाराव्या शतकानंतरच्या कालखंडातील मराठी भाषेत फारसीचं प्रतिबिंब आढळून येऊ लागलं.
 
राज्यकर्त्यांची भाषा
फारसी भाषा मुस्लीम राज्यकर्त्यांसोबतच व्यापारी, प्रवासी आणि सुफी संतांच्या मार्फतही महाराष्ट्रात आली असावी. पण ती इथे रुळली आणि मराठीत मिसळली, ती मात्र राजभाषा म्हणूनच.
तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण या प्रदेशाचं राजकारण बदलवून टाकणारं ठरलं. मग चौदाव्या शतकात मोहम्मद तुघलक शहानं आपली राजधानी काही वर्षांसाठी दिल्लीहून देवगिरीला म्हणजे आजच्या दौलताबादला हलवली. त्यानंतर बहामनी राजवटींच्या काळात फारसी महाराष्ट्राची राजभाषा म्हणून आणखी रूढ होत गेली.
 
डॉ. पृथ्वीराज तौर त्याविषयी माहिती देतात. तौर गेली सतरा वर्ष नांदेडच्या रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठीचं अध्यापन करत आहेत.
 
ते सांगतात, " दहाव्या शतकानंतर एकूणच भारतात सगळीकडेच वेगवेगळ्या इस्लामिक राज्यकर्त्यांचा प्रभाव राहिला. आपल्याकडे महसूल व्यवस्था अस्तित्वात आली, त्यात मुस्लिम राज्यकर्त्यांचं योगदान मोठं आहे. या महसुली व्यवस्थेतले अनेक फारसी शब्द आजही रूढ आहेत.
 
"पंधराव्या शतकात विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही या सगळ्यांचा उदय सुरू झाला. त्यांची राज्यकारभाराची भाषा म्हणजे फारसी ही व्यवहाराची भाषा बनत गेली. जमादार, फौजदार, भालदार, चोपदार, नाका, जकात हे सगळे शब्द या इस्लामी भाषांमधून आपल्याकडे आले आहेत."
 
एकनाथांचा 'अर्जदस्त' आणि फारसीचं प्रतिबिंब
मराठीवर फारसी भाषेचा परिणाम कसा होत गेला, हे मराठी साहित्यातून दिसून येतं. तसंच त्या काळातल्या दस्तावेजांमधूनही दिसून येतं. (हा दस्तावेज शब्दही फारसीतूनच आला आहे, बघा.
 
संत एकनाथांचा एक 'अर्जदस्त' प्रसिद्ध आहे. या अर्जातले बहुतांश शब्द, अगदी अर्ज हा शब्दसुद्धा, फारसी भाषेतले आहेत.
 
डॉ. तौर सांगतात, "एरवी एकनाथांनी मराठीतून लिखाण केलं. पण अर्ज हा कोणाकडे करतात, तर राज्यकर्त्यांकडे. त्यामुळेच तो राज्यकर्त्यांच्या भाषेत लिहिला आहे."
 
शिवकालातली फारसी-मराठी
शिवाजी महाराजांच्या काळातही फारसीचा वापर खूप वाढला होता. त्या काळातल्या अनेक पत्रांमध्ये फारसीचं वर्चस्व दिसतं. इतकं, की अनेकदा आपण नेमकी कोणती भाषा वाचतो आहोत, असा प्रश्न पडावा. इतिहासकार वि. का. राजवाडे यांनीही त्याविषयी लिहिलं आहे.
 
स्वतः शिवाजी महाराजही उत्तम फारसी बोलू शकत होते, असे उल्लेख आहेत. पण त्यांनीच मराठीवरचा फारसीचा हा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्नही केले. स्वराज्याची स्थापना केल्यानंतर महाराजांनी राजव्यवहार कोषाची निर्मिती केली.
 
प्रा. तौर यांच्यामते मराठी भाषाशुद्धीची सुरूवात ही तिथपसून सुरू होते. "माझी भाषा मला सुधारायची आहे, त्याच्यावरचा अन्य भाषांचा परिणाम कमी व्हायला हवा अशी त्यामागची भावना होती. राजव्यवहारातले प्रधान, आमात्य, सरसेनापती असे शब्द छत्रपती शिवाजी महाराजांनी नव्यानं रूढ केले. पण गड, किल्ले यांच्यासंदर्भात असेल किंवा इतर अनेक गोष्टींसाठी फारसी शब्दच वापरात कायम राहिले."
 
आजच्या मराठीतली फारसी
आजही महाराष्ट्रात, विशेषतः निजामाच्या प्रभावाखाली राहिलेल्या मराठवाड्यात बोलीभाषेवर फारसी शब्दांचा आणि फारसीतूनच जन्मलेल्या उर्दूचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.
 
फारसी आणि मराठीचं हे नातं अनेकांना भुरळ पाडत आलं आहे. या नात्याचा आणि फारसीच्या मराठीवरील प्रभावाचा अभ्यास गेली जवळपास शंभर वर्ष सुरू आहे.
 
1925च्या सुमारास लेखक-कवी माधव ज्युलियन (माधव पटवर्धन) यांनी पहिल्या फारसी-मराठी शब्दकोशाची निर्मिती केली होती. माधव ज्युलियन यांनी फारसी भाषेचं शिक्षण घेतलं होतं आणि ते ही भाषा शिकवतही होते.
 
फक्त शब्दच नाही, तर शह देणे, आर्जव करणे, वाहवा करणे, सर्द होणे, दावा सांगणे, दौलतजादा करणे, नेस्तनाबूत करणे असे वाक्प्रचार आणि शब्दरचनांही फारसीनं मराठीला दिलेली देणगी आहे.
 
भाषाशुद्धीसाठी अनेक चळवळी होऊनही हे शब्द टिकून राहिले आहेत, कारण ते मराठीनं स्वीकारले आहेत, आपलेसे केले आहेत.
 
भाषेला समृद्ध करणारा वारसा
पाच शतकांनंतर अनेक फारसी शब्द इथे रुजले, वाढले आहेत, मराठी बनून गेले आहेत. पण तरीही भाषाशुद्धीचा आग्रह धरला जातो, ते योग्य आहे का? असा प्रश्न पडतो.
 
केवळ संस्कृत आणि प्राकृतपासून मराठीचा विकास झाला, असा अनेकांचा समज असतो पण मराठीनं या भाषांबरोबरच फारसी, इंग्रजी, भाषांमधूनही बरंच काही स्वीकारलं आहे. तुर्की, अरबी, कानडी, तेलुगू, गुजराती, हिंदी, फ्रेन्च, पोर्तुगीज आणि पंजाबीतले शब्दही मराठीत रुळले आहेत.
 
हा मराठीला समृद्ध करणारा वारसा असल्याचं डॉ. तौर यांना वाटतं. "कोणतीही भाषा असे शब्द स्वीकारते तेव्हा ती शरण जात नसते. तर स्वतःला विस्तारत असते. ब्रिटिशांनी जगभरातल्या भाषांतून आपले शब्द स्वीकारले म्हणून ती एवढी प्रभावी ठरली आहे अन्य भाषांनी मराठीला खूप काही दिलं आहे. कोणत्याही भाषेच्या संदर्भात आपल्याला असं सकारात्मक असायला हवं."
 
भाषा भाषांमधल्या या विस्तृत नात्यांची माहिती झाली तर मनाची कवाडं उघडायलाही मदत होऊ शकते आणि लोक सर्वसामावेशक होऊ शकतात.
 
चिन्मय धारुरकरही तेच सांगतात. "अनेकदा फारसीविषयीचा आक्षेप हा भाषेविषयीचा आहे की तिच्याशी जोडलेल्या धर्माविषयी आहे, असा प्रश्न पडतो. पण वेगवेगळ्या भाषांमध्ये अशी शब्दांची उसनवारी होत असते. ती एका दिवसात काढून टाकणं म्हणजे भाषेचा इतिहास नष्ट करण्यासारखं आहे."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती