एकदा ऐकले काहींसें असें
असीम अनंत विश्वाचे रण
त्यात हा पृथ्वीचा इवला कण
त्यांतला आशिया भारत त्यांत
छोट्याशा शहरीं छोट्या घरांत
घेऊन आडोसा कोणी 'मी' वसें
क्षुद्रता अहो ही अफाट असें!
आणिक तरीही अहंता किती?
परंतु वाटलें खरें का सारें?
क्षुद्र या देहांत जाणीव आहे
जिच्यात जगाची राणीव राहे!