मराठी टिकावी यासाठी काय कराल?

दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा अभिमान बाळगत मराठीचे गर्वगीत मोठ्या जोशात म्हणत असतो. पण हे दोन दिवस उत्साहात साजरे करून आणि 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...' असे अभिमान गीत म्हणून खरोखरच मराठी टिकेल का? याचा विचार खरं तर आपण कधीच करत नाही.

मुळात आपण मराठी असल्‍याचा अभिमान असला तरीही ब-याच जणांना तथाकथित 'कार्पोरेट कल्‍चर'मध्‍ये वावरताना आपल्‍या मराठी सहका-यांशीही मराठीतून बोलायला संकोच वाटतो. अर्थात याला सन्‍मान‍ीय अपवाद आहेतही. पण खरच मराठी टिकावी असे वाटत असेल तर काही साध्‍या-साध्‍या गोष्‍टी आपण आपल्‍या रोजच्‍या जीवनात सहज अवलंबून मराठी टिकवण्‍यात आपला हातभार लावू शकतो. मराठी भाषा टिकवण्‍यासाठी आपण खालील गोष्‍टी सहज करू शकतो.

1. घरात, नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्‍ये मराठीतूनच बोला. घरातील लहान मुलांशी बोलताना त्यांना मराठीतून बोलण्‍याची सवय लावा. त्‍यांना मराठी माध्‍यमातील शाळेतच घाला असे म्हणणे आजच्‍या जगात व्‍यवहार्य नसले तरीही जागतिक भाषा शिकवताना त्यांना मराठी भाषेबद्दलही आदर आणि लळा राहील याची काळजी घेणे हे प्रत्येक मराठी पालकांचे कर्तव्‍य नाही का?

2. कार्यालय आणि कार्यालयाबाहेरही मराठी सहका-यांशी मराठीतून बोला व तसे करण्‍याचा आग्रह धरा. ब-याच जणांना तसे करणे खटकू शकते आणि समोरची व्‍यक्ती तुमच्‍याशी हिंदी किंवा इंग्रजीतून बोलण्‍याचा प्रयत्न करू शकते. मात्र तुम्ही मराठीतूनच बोलून त्यांनाही तसे करण्‍यास भाग पाडू शकतात. मराठी माणसालाच मराठीतून बोलण्‍याची लाज वाटल्‍यास 'लाभले अम्‍हांस भाग्य बोलतो मराठी' हे कसे साध्‍य होईल?

3. मोबाईल कंपन्‍यांसह अनेक बहुराष्‍ट्रीय कंपन्‍यांच्‍या ग्राहक सेवा प्रतिनिधींशी (म्हणजे 'कस्‍टमर केअर एक्झीक्युटीव्‍ह' बरं का) मराठीतूनच बोला. अनेक कंपन्‍या मराठी भाषेतून बोलणा-यांसाठी खास मराठी प्रतिनिधींची नियुक्ती करत असतात. आपण मराठीतून बोलण्‍याचा आग्रह धरल्‍यानंतर सर्वच कंपन्‍यांना मराठी प्रतिनिधी नियुक्त करावेच लागतील. त्‍यामुळे मराठी तरुणांनाही रोजगार मिळेल. मराठी माणूसच इंग्रजी किंवा हिंदीचा वापर करू लागल्‍यास ज्या कंपन्‍या सध्‍या मराठीतून सुविधा देत आहेत. त्‍या गरज न उरल्‍याने कदाचित मराठीतून सेवा देणं बंद करतील.

3. रेल्‍वे स्‍थानक, चित्रपट गृहांची तिकिट खिडकी व बँकांमध्‍येही मराठीतूनच बोला आणि समोरच्‍यालाही तसे करण्‍याचा आग्रह धरा.

4. मुंबईसह महाराष्‍ट्रातील कुठल्‍याही व्यवसायिकाशी मराठीतूनच बोला.

5. ई-मेल, एसएमएस मराठीतूनच पाठविण्‍याचा स्‍वतःशीच निर्णय घ्‍या. आजकाल सर्वच वेबसाईट मराठीतून मेल लिहिण्‍याची सोय देत असतात.

गेल्‍या काही दिवसांत मराठीच्‍या मुद्याला धार मिळाल्‍याने आता मराठीच्‍या वापराबद्दल आग्रह वाढू लागला असला तरीही घराघरातून मराठीचे बोल आणि मराठी शुभंकरोती ऐकायला मिळेल तेव्‍हाच मराठी तग धरू शकेल ही बाब लक्षात घ्‍या.

जगभरातील सुमारे १० कोटी लोकांची भाषा मराठी आहे. याची जाणीव ठेवा आणि आपल्‍या भाषेचा अभिमान बाळगा. जय महाराष्‍ट्र जय मराठी.

वेबदुनिया वर वाचा