सज्ज झालो आम्ही..नववर्षाच्या स्वागतासाठी..

सोमवार, 30 डिसेंबर 2019 (15:22 IST)
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वचजण उत्सुक असतील, शिवाय स्वागताची तयारीही अनेकांनी आतापासूनच सुरुही केली असेल. सर्व तरुणाई या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. येणारे नवीन वर्ष आयुष्यात आणखी आनंद घेऊन येणारे तसेच या देशाला महासत्ता करण्यासाठी आणखी समर्थ बनविणारे असेल याही विचाराने या वर्षाचे स्वागत देशातील प्रत्येकाने करायला हवे. 
 
लहानपणापासून आतापर्यंतचा जीवनप्रवास पाहत असताना किंबहुना त्याचे सिंहावलोकन करीत असताना प्रत्येक वर्षी आपण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विलक्षण उत्साह दाखविला होता हे ध्यानात येईल. परंतु वर्षामागून वर्षे पाठीमागे पडत असताना येणार्‍या प्रत्येक नवीन वर्षात आपण आपल्या ध्येयाजवळ पोहोचण्यासाठी कोणते प्रयत्न केलेत याचेही स्मरण निश्चित होईल. 
 
केवळ आणि केवळ काही तरी संकल्प सोडण्यासाठी नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो हे खूळ डोक्यातून आधी काढून टाकायला हवे आणि अत्यंत मोकळेपणे नवीन वर्षाचे स्वागत करायला हवे. कोणत्याही चांगल्या कामासाठी मुहूर्तापेक्षा आत्मविश्वास आवश्यक असतो. म्हणूनच वाचनाचा, पहाटे लवकर उठण्याचा, नवाउद्योग सुरु करण्याचा, व्यसन सोडण्याचा संकल्प करता यावा म्हणून कोणत्याही नवीन वर्षाचा पहिला दिवस कधीही नसतो. ईच्छाशक्ती अंगी असली की रोज उजाडणारा दिवसही वरील गोष्टींपासून दूर राहण्याचा संकल्प सोडण्यासाठी महत्त्वाचाच असतो. मागील वर्षीच्या पहिल्या दिवशी आपण काय संकल्प सोडला होता, आणि तो आतापर्यंत आपण पाळला का याचे चिंतन सुरु केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल की नवीन वर्षाचे स्वागत संकल्प सोडण्यापेक्षा त्या दिशेने ठोसपणे कृती करण्यासाठी असणे आवश्यक असतो. याहीवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वचजण सज्ज असतील यात दुमत नाही. येणारे नवीन वर्ष या देशाला महासत्तेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकणारे ठरावे या विचारानेच त्याचे स्वागत प्रत्येकाने करायला हवे आहे. पार्ट्या करून मावळत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी करण्याआधी आयुष्यातील उत्साह मावळू नये यासाठी आपण काय केले याचाही विचार एकदा पार्ट्या करणार्‍यांनी करायला हवा आहे.
 
आपण 2020 मध्ये पदार्पण करीत आहोत. 2020 पर्यंत भारत महासत्ता होईल, असे स्वप्न भारताचे माजी राष्ट्रपती तथा थोर शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी पाहिले होते. विशेष म्हणजे हे स्वप्न तरुणांच्याच जीवावर त्यांनी पाहिले होते. डॉ. कलाम यांच्या स्वप्नपूर्तीसाठी राष्ट्रासाठी आपण कोणते योगदान दिले याचाही विचार करायला लावणारे हे वर्ष आहे असे म्हणावे लागेल. आतापर्यंत झाले नाही, परंतु येणार्‍या वर्षापासून तरी आपण असे योगदान देण्याचा प्रयत्न करू, आणि डॉ. कलाम यांच्या स्वप्नपूर्तीसाठी नव्या जोमाने, उत्साहाने, उमेदीने नवीन वर्षाचे स्वागत करू हा दृष्टिकोन तरुणाईने समोर ठेवायला काहीच हरकत नाही.
 
सचिन वायकुळे  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती