"प्रार्थनेत असणं हेच पुरेसं असतं"

बुधवार, 24 मार्च 2021 (15:08 IST)
एकदा एका शिष्याने समर्थ रामदासांना विचारले, "गुरुजी, प्रार्थनेचे अनंत प्रकार आहेत. कोणी वाद्य वाजवून कोणी गाऊन, ओरडून, कोणी करूणा भाकून, कोणी डोळे मिटून तर कोणी मौन प्रार्थना करतात. पण प्रार्थना मौन असली तरी ओठ हलतात, चर्येवर भाव उमटतात, आपण मात्र अगदी निश्चल राहून प्रार्थना करता, असे का ?"
 
रामदास स्वामी हसले, म्हणाले, "एकदा मी असा प्रसंग पाहिला की, एका राजवाड्याच्या दारात एक भिकारी उभा होता. अत्यंत कृश, पोट खपाटीला गेलेलं, अंगावर चिंध्या, आत्ता पडेल की मग पडेल अशी स्थिती. डोळे आशाळभूतासारखे सर्वांवरून फिरत होते. थोडा वेळ वाट पाहून राजाने त्याला बोलावले. विचारले, "बोल, काय पाहिजे तुला?"
 
"माझ्याकडे पाहून मला काय पाहिजे असेल हे जर समजत नसेल, तर मला काहीच मागायचे नाही. मी तुमच्या द्वारी उभा आहे ! माझ्याकडे नीट पहा, माझं असं असणं, माझी अवस्था, हीच माझी प्रार्थना आहे. या वेगळं शब्दात काय सांगू?"
 
समर्थ म्हणाले, "त्या दिवसापासून मी प्रार्थना बंद केली. मी परमेश्वराच्या दारी उभा आहे. तो अंतर्यामी आहे, माझ्या मनात काय आहे ते तो जाणतो. या परते शब्दात काय मागू ?  
 
'तो' बघून घेईल. जर माझी 'स्थिती' काही सांगू शकत नसेल तर शब्द काय सांगणार? जर माझी 'अवस्था' त्याला समजत नसेल, तर शब्द काय समजणार? 
 
म्हणून अंतःकरणातले भाव आणि दृढ विश्वास हेच खर्‍या परमेश्वर प्रार्थनेचे लक्षण आहे. तिथे 'मागणं' काही उरत नाही. तुम्ही प्रार्थनेत 'असणं' हेच पुरेसं असतं"
 
- सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती