.......आमच्या वेळच्या ह्या कलाकारांना आमचा सलाम !!
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (11:03 IST)
वय जसं वाढत जात तसं तसं आपलं मन बालपणी च्या आठवणीत रमत जात. कित्तीतरी रम्य आठवणी तिथेच रुंजी घालत असतात, त्या तेव्हा ही तेवढ्याच सुखावह असतात तितक्याच आत्ताही असतात, किंबहुना जास्त सुखावून जातात.
पूर्वी शाळेत जाताना हातात दप्तर(पिशवी)असायची रमत गंमत(चप्पल घालून)प्रायमरी शाळेत जायची मजा काही औरच.
रस्त्यावर पूर्वी रंगीत खडूने भले मोठे चित्र काढलेले असायचे. कुणी अज्ञात कलाकाराने आपली कलाकारी, रस्त्याचा कॅनव्हास करून मनलावून चितारलेली असायची.
लोक बघत राहायचे येता जाता, आम्ही पण त्या गर्दीत असायचो, कधी साईबाबा, शंकर भगवान, कधी कोणते कधी कोणते देव साकारलेले असायचे.
खूपच आवडायचे ते रंगीत खडूचे चित्र! कुणी ५ कुणी १० पैसे टाकायचे. कुणी खूपच उदार दाता एक रुपया टाकायचा.
दिवसा अखेर तो "कलाकार"ते पैसे गोळा करीत असे.(किती व्हायचे माहिती नाही.)
पण काळ बदलला आणि तो कलाकार कुठं अज्ञात वासात गेला कळलं ही नाही.
शाळेत मनोरंजनाच्या नावाने "जादूगारा"चे जादूचे खेळ होत असत. साधारण एक तासाचा कार्यक्रम असायचा, आमच्या कडून ५० पैसे वगैरे प्रत्येकी घेण्यात येई.
कोण आंनद व्हायचा ते बघताना. खरोखरच त्या जादुई दुनियेत पार हरवून जायचो. हे खेळ म्हणजे "हात सफाई"आहे हे अजिबात पटायचं नाही.पोट भरायला हे "तो"सगळं करतोय हे समजायचं वय नव्हतं ते.त्यामुळेच जादूगार नावाचं महान व्यक्तिमत्त्व सदैव मनाच्या जवळपासच असायचं!
नंतर मोठे झाल्यावर खऱ्या दुनियेच्या खूप मोठ्या जादु बघितल्या , फसवणुक बघितली आणि खरे "कलाकार"ओळखू यायला लागलेत.!
.......आमच्या वेळच्या ह्या कलाकारांना आमचा सलाम !!