दोन चोरांची गोष्ट, जीवन बदलून देतील

सोमवार, 8 मार्च 2021 (17:44 IST)
चोर १ –
अमेरिकेमध्ये ‘आर्थर बेरी’ नावाचा दागिने चोरी करण्याच्या कलेत पारंगत असलेला, आणि चोरीचं असामान्य टॅंलेंट लाभलेला चोर होऊन गेला. अमेरिकेच्या गुन्हेगारी इतिहासात त्याचं नाव आजही एक नंबरला आहे, इतका तो सफाईदार चोर होता. 
 
एकोणीसशे वीसच्या दशकात लोकांनी त्याला ‘ग्रेटेस्ट ज्वेल थीफ’ अशी उपाधी देऊन एक प्रकारे त्याचा गौरवच केला होता. तो फक्त अतिश्रीमंत लोकांनाच टारगेट करायचा, आणि त्याने चोरी करणं, हे सुद्धा एक प्रतिष्ठेचचं लक्षण होवुन बसलं .चोरी करणं वाईट असलं तरी लोकांमध्ये ह्या चोराबद्द्ल आकर्षण, कौतुक आणि सहानभुती होती.
 
त्याच्या दुर्दैवाने एक दरोडा टाकताना, पोलीसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या, आणि त्याला पकडला!  वयाची पुढची अठरा वर्षे त्याने जेलमध्ये काढली. जेलमधुन बाहेर आल्यावर त्याने गुन्हे करणं, चोर्‍या करणं सोडुन साध जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला, पण ‘द ग्रेट ज्वेल थीफ आर्थर बेरी’ बद्द्ल लोकांचं कुतुहुल अद्यापही कमी झालं नव्हतं. 
 
लोकांनी बदललेल्या आर्थर बेरीची एक सार्वजनिक मुलाखत घेतली, ती ऐकायला मोठा जमाव जमला होता, अनेक प्रश्न विचारले, आर्थरनेही दिलखुलास उत्तरे दिली.
 मुलाखत खुप रंगली,
 
मुलाखतकाराने शेवटचा प्रश्न विचारला, “तुम्ही सर्वात मोठी चोरी कोणत्या माणसाकडे केली?, खरं खरं उत्तर द्या.”
“तुम्हाला खरचं, खरं खरं उत्तर ऐकायचं आहे का?” गर्दीकडे पाहुन आर्थरने विचारले.
“हो, हो!” एकच गलका झाला.
“मी सर्वात मोठी चोरी ज्या माणसाकडे केली, त्या माणसाचे नाव आहे, ‘आर्थर बेरी’, हो! मीच माझा सर्वात मोठा गुन्हेगार आहे.” 
सगळे एकदम अवाक आणि शांत झाले.
 
“मी एक सफल व्यापारी होऊ शकलो असतो, मी वॉल स्ट्रीटचा अनाभिषिक्त सम्राट होवु शकलो असतो, मी समाजाची सेवा करणारा एक नशीबवान व्यक्ती बनु शकलो असतो, पण हे न करता मी चोरी करण्याचा मार्ग निवडला, आणि माझं एक तृतीयांश जीवन मी जेलमध्ये वाया घालवलं.”
 
चोर २ –
१८८७ चा एक पावसाळा, एका किराणा दुकानामध्ये भिजत भिजत एक ग्राहक आत शिरला. त्याने काही वस्तु खरेदी केल्या, आणि काऊंटरवर वीस डॉलर्सची नोट दिली आणि तो बाहेर पडला. 
 
कॅश काऊंटर वर असलेल्या स्त्रीने स्मितहास्य केले, आणि नोट गल्ल्ल्यात टाकली, तो त्यांचा नेहमीचा ग्राहक होता, दुकानाजवळच राहणारा तो एक होतकरु चित्रकार होता. एमानुअल निंगर त्याचं नाव!
 
नोटा ओल्या असल्याने तिच्या हाताला शाई लागली, तिने बारकाईने नोट पाहिली, ती हुबेहुब नोट होती, पण शाई सुटल्याने तिला बनावट नोट असल्याचा संशय आला, शहानिशा करण्यासाठी, तिने पोलिसांना बोलावले. ती एक बनावट नोट होती, पण इतकी हुबेहुब नक्कल पाहुन पोलिसही चक्रावले.
 
पोलिसांनी चित्रकाराच्या घरावर छापा मारला, त्याच्या पेंटींग्ज जप्त केल्या गेल्या. चित्रकार निंगर जेलमध्ये गेला. आतापर्यंत अनेक बनावट नोटा रंगवुन बाजारात वापरल्याचे त्याने कोर्टासमोर कबुल केले. कोर्टाने त्याच्या चित्रांचा लिलाव करुन नुकसानभरपाईचे आदेश दिले.
 
तो जेलमध्ये असतानाच त्याच्या चित्रांचा लिलाव झाला, त्याचे प्रत्येक चित्र पाच हजार डॉलरहुन अधिक किमतीला विकले गेले. लाखो डॉलर्स जमा झाले. 
 
विडंबना ही होती की पाच हजार डॉलर्सचे चित्र बनवणार्‍या निंगरला त्यापेक्षा जास्त वेळ, वीस डॉलर्सची नोट बनवायला लागायचा. 
 
तात्पर्य
- आपली अंगभुत कला न ओळखणारा, प्रत्येक जण चोर आहे.
 
- ती प्रत्येक व्यक्ती चोर आहे, जो आपल्या पुर्णपणे क्षमतेचा वापर करत नाही.
 
- ती व्यक्ती चोरच आहे, ज्याला, आपल्या स्वतःवर विश्वास नाही.
 
- तो प्रत्येक रिकामटेकडा चोर आहे, जो समाजाला काहीही देत नाही आणि केवळ राजकारणावर फुकट चर्चा करण्यात आपला वेळ वाया घालवतो.
 
- आपल्या कामावर प्रेम न करणारा, कामाला न्याय न देणारा प्रत्येक जण चोर आहे.
 
स्वतः मधील टॅलेंट ओळखा व ते योग्य कामात वापरा  ।
 
- सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती