आंतरधर्मीय विवाह: 'मुस्लीम मुलाशी लग्न करतेय म्हणून मला धमक्यांचे फोन आले'

बुधवार, 14 जुलै 2021 (19:16 IST)
मयांक भागवत
आंतररधर्मीय विवाह करत असल्यामुळे एका मुलाला कडव्या हिंदुत्ववादी लोकांच्या जाचाला सामोरं जावं लागलं आहे. आपल्याला आणि कुटुंबीयांना धमक्यांचे फोन आल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याचं संबंधित मुलीने सांगितलं आहे.
 
"मुस्लीम मुलाशी लग्न करते, म्हणून धमक्यांचे फोन आले, निनावी पत्र आलं. वडिलांचं ब्रेनवॉश केलं गेलं. एवढंच नाही, तर, माझ्या घरापर्यंत येण्याची, आता त्यांची मजल गेलीये. मला माझी आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेची काळजी वाटू लागली आहे."
 
बीबीसीशी फोनवर बोलताना, 31 वर्षीय सुनैना (नाव बदललेलं) यांच्या आवाजात दहशत स्पष्ट जाणवत होती.
 
सुनैना, आपल्या मर्जीने एका मुस्लीम युवकाशी लग्न करत आहेत. पण, हिंदू असूनही मुस्लीम युवकाशी लग्न करण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे, काही लोक त्यांच्या लग्नाला विरोध करत आहेत.
सुनैना यांनी मुंबई पोलिसांमध्ये याबाबत तक्रार दिलीये. सुनैना यांच्या तक्रारीबाबत पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. त्यांच्याकडून प्रतिक्रिया आल्यावर अपडेट करण्यात येईल.
 
आम आदमी पक्षाच्या प्रिती शर्मा मेनन ट्विटरवर म्हणतात, "ही गोष्ट धक्कादायक आहे. आंतरधर्मीय विवाहासाठी नोंदणी केल्यामुळे एका महिलेला हिंदुत्ववादी गुंडांनी धमकावलं आहे."
"सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, या मुलीची माहिती त्यांना कशी मिळाली?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
 
'लग्नासाठी रजिस्ट्रेशन केल्यापासून सुरू झालं धमकीसत्र'
सुनैना यांनी 14 जूनला विशेष विवाह कायद्यांतर्गत (Special Marriage Act) मुंबईतील खार परिसरातील विवाह नोंदणी कार्यालयात लग्नासाठी नोंदणी केली.
 
दुसऱ्या दिवसापासूनच मुस्लीम मुलाशी लग्न करता, म्हणून त्यांना धमकीचे फोन, पत्र आणि मेसेज येणं सुरू झालं.
 
त्या सांगतात, "रजिस्ट्रेशनच्या दुसऱ्याच दिवशी, 15 जूनला, माझ्या वडीलांना एक निनावी एक पत्र आलं."
"तुमची मुलगी या तारखेला, एका मुस्लीम मुलाशी लग्न करणार आहे. तुम्ही तपासून पाहा, " असं या पत्रात लिहिण्यात आलं होतं.
 
पत्र, पाठवणाऱ्यांकडे, आमची सर्व खाजगी माहिती होती, त्या म्हणतात.
 
सुनैना पुढे सांगतात, मराठीत लिहीलेल्या या पत्रात, "मुस्लीम मुलं, हिंदू मुलींना लग्न केल्यानंतर, सौदी अरेबियात नेऊन विकतात. वेळ अजूनही गेलेली नाही, तुम्ही मुलीला वाचवा, असं लिहिण्यात आलं होतं."
हे पत्र म्हणजे माझ्या वडिलांना देण्यात आलेला, एक इशारा होता, असं त्यांचं म्हणणं आहे.
 
सुनैना यांनी हे निनावी पत्र मिळाल्यानंतर, मॅरेज रजिस्ट्रार ऑफिसमध्ये एजंटशी संपर्क केला. त्या सांगतात, "एजंट म्हणाले, विशेष विवाह कायद्यांतर्गत (Special Marriage Act) रजिस्टर होणाऱ्या लग्नात अशा घटना होतात. तुम्ही याकडे लक्ष देऊ नका."
 
याचा अर्थ स्पष्ट आहे, अशा घटना घडतात, त्या पुढे म्हणल्या.
 
'मी दरवाजा उघडला आणि...'
सुनैना पुढे सांगतात, रजिस्ट्रेशननंतर घडलेल्या गोष्टी आम्ही विसरून गेलो. माझे वडील, होणाऱ्या नवऱ्याला काही दिवसांपूर्वी भेटले सुद्धा. त्यांना, माझा होणारा पती आवडला सुद्धा.
 
पण, "मंगळवारी (13 जुलै) मी घराचा दरवाजा उघडला आणि पाहाते तर काय. मुस्लीम मुलाशी लग्न करू नका, हे समजावण्यासाठी तीन लोक माझ्या घरापर्यंत पोहोचले होते."
 
त्या पुढे म्हणाल्या, "आम्हाला तुमच्या वडिलांशी बोलायचं आहे. त्यांनी मला सांगितलं, पण मी दरवाज्यातूनच त्यांना घालवून दिलं. माझं खूप मोठं भांडण झालं."
 
"मी 31 वर्षांची आहे. सज्ञान आहे, स्वत:चे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. मग, मला धमकावणारे आणि लग्न करू नको असं सांगणारे हे कोण?" असा सवाल सुनैना विचारतात.
 
'लग्नाचे मेसेज व्हायरल केले'
"मला माझे नातेवाईक आणि कुटुंबीयांना ओळखणाऱ्यांकडून फोन येऊ लागले. एवढंच नाही, गुजरातमध्ये राहाणारी मावशी आणि कोलकातामध्ये रहाणाऱ्या काकांनाही मेसेज मिळालाय."
 
"माझ्या लग्नाला विरोध करणाऱ्यांनी, माझ्या समुदायातील अनेकांना, मेसेज पाठवले," असं त्या सांगतात.
 
'वडिलांना ब्रेनवॉश केलं'
घडलेल्या संपूर्ण प्रकरणाबाबत पुढे माहिती देताना सुनैना म्हणतात, "माझ्या वडिलांचं दोन तास ब्रेनवॉश करण्यात आलं. मुलीला घरातून बेदखल करा, असंही सांगण्यात आलं."
 
माझे वडील सेक्युलर विचारधारेचे आहेत. आंतरधर्मीय विवाहाला त्यांचा विरोध नाही. पण, या घटनेमुळे ते भीतीच्या सावटाखाली आहेत, "त्यांना आमची खूप काळजी वाटतेय."
"लग्न कसं होणार? मला, खूप भीती वाटतेय," हे सांगताना त्यांच्या आवाजात चिंता स्पष्ट जाणवत होती.
 
"घडलेल्या घटनेमुळे माझे आई-वडील खूप घाबरलेत. त्यांची तब्येत बिघडलीय. त्यांच्या मनावर खूप मोठं दडपण आलंय."
 
पोलिसात दाखल केली तक्रार
मंगळवारी घडलेल्या घटनेबाबत सुनैना यांनी मुंबईच्या खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
 
त्या सांगतात, "मंगळवारी घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती मी पोलिसांना दिलीये. घरी आलेल्या तीन लोकांविरोधात तक्रार दाखल केली. मी खूप घाबरले होते. आई-वडील आणि माझ्या सुरक्षेची काळजी होती."
 
मात्र, मुंबई पोलिसांकडून सुनैना यांच्या तक्रारीबद्दल अजून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
 
"मी लग्न होणार म्हणून आनंदात होते. घरच्यांनाही सांगितलं असतं, पण, या लोकांनी माझ्या आनंदी घरात, विरजण टाकलंय."
 
"आता पुढे काय होईल? लग्न कसं होईल? याची काहीच माहिती नाही," असं सुनैना सांगतात.
 
'फक्त जोडप्यांनाच नोटीस पाठवावी, माहिती उघड होऊ नये'
जोडप्यांची माहिती उघड न करता त्यांना थेट नोटीस पाठवावी. ती नोटीस सर्वांसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन खुली नसावी अशी मागणी राईट टू लव्ह या संस्थेच्या सदस्य दीप्ती नितनवारे यांनी केली आहे.
 
"आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहासांठी 30 दिवसांची नोटीस फार मोठा काळ आहे. विवाह नोंदणी कार्यालयात सार्वजनिक नोटीस लावली जाते. त्याला काही संरक्षण नाही."
राईट टू लव्ह, संघटनेचे कार्यकर्ते म्हणतात, Online पद्धतीचा वापर करून थेट नोटीस जोडप्यांनाच मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
 
दीप्ती पुढे म्हणतात, " जोडप्यांना थेट नोटीस पाठवली तर लोकांची खासगी माहिती बाहेर जाणार नाही. सार्वजनिक नोटीस लावल्याने त्या मुला-मुलीच्या जीवाला धोका निर्माण होतो."
 
गेल्या सहा वर्षांत 'राईट टू लव्ह'ने अनेक आंतरधर्मीय आणि आंतरजातीय लग्न विशेष विवाह कायद्याअंतर्गत लाऊन दिली आहेत.
 
विशेष विवाह कायदा काय आहे?
संसदेने मंजूर केलेल्या 1954 च्या विशेष विवाह कायद्यांतर्गत
 
दोन विभिन्न धर्माचे व्यक्ती, धर्म न बदलता लग्न करू शकतात
लग्न करण्यासाठी, सरकारी विवाह नोंदणी कार्यालयात 30 दिवसांची नोटीस द्यावी लागते
हा कायदा देशातील सर्वांना लागू आहे
मुलाचं वय 21 आणि मुलीचं वय 18 असणं बंधनकारक आहे
नोटीसच्या दिवसापासून 30 दिवसांपर्यंत विवाहासंबंधी काही आक्षेप किंवा हरकत प्राप्त झाल्यास विवाह अधिकारी या आक्षेपांची चौकशी करतात
प्राप्त झालेल्या आक्षेपात कायदयात नमूद तरतुदीप्रमाणे तथ्यांश दिसून आल्यास विवाह संपन्न केला जात नाही
आंतरधर्मीय विवाहांना होणारा विरोध
भारतात जात किंवा धर्माबाहेर लग्न हे वादाचं कारण ठरू शकतं. भारतीय, समाजात आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाहांना सहसा, समाजाकडून मान्यता मिळत नाही.
 
मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलीच्या आंतरधर्मीय विवाहाला बऱ्याचदा 'लव्ह जिहाद'चा रंग दिला जातो. या मुद्याचा राजकीय फायद्यासाठी वापर झाल्याचंही आपण पाहिलंय.
 
उत्तरप्रदेश सरकारने काही महिन्यांपूर्वी अवैध धर्मांतर प्रतिबंध कायदा केला. लग्नासाठी जबरदस्तीने धर्मांतर करण्याची प्रकरणं वाढत असल्यामुळे, हा कायदा करण्यात आला होता.
 
तर, मध्यप्रदेश सरकारनेही आंतरधर्मीय विवाहांसाठी विशेष कायदा कायदा करणार असल्याची माहिती दिली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती