सावित्रीबाई फुले: पहिल्या महिला शिक्षिका ज्यांच्या अंगावर शेण फेकले गेले तरी त्या डगमगल्या नाहीत

शुक्रवार, 3 जानेवारी 2020 (12:47 IST)
महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. त्या शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.
 
१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.
 
या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली.
 
सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण, दगडं फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
 
काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. जोतिरावांनी सुरु केलेले बालहत्या प्रतिबंधक गृह सावित्रीबाईंनी समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
 
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला.
 
इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती