अन्ना हजारे बर्थडे

मंगळवार, 15 जून 2021 (08:36 IST)
किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे यांचा जन्म 15 जून 1937 भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र – हयात येथे झाला होता. मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे किसन बाबुराव तथा अण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत. १९९० साली त्यांना त्यांच्या समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. या नंतर अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकारावर त्यांनी पुस्तकाचे लेखनही केले आहे. या आंदोलनामुळे सरकारला सर्वसामान्यांना माहितीचा अधिकार देण्याचा कायदा लवकर संमत करावा लागला. अण्णा हजारे यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलने करून जनजागृतीची कामे केली आहेत. त्यांच्या आंदोलनांमुळे महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.
 
हजारे यांचे बालपण 
हजारेंचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. १९४५मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर बाबूरावांनी सुरुवातीला भिंगारमध्येच बस्तान बसवले, पण नंतर १९५२ साली ते राळेगण सिद्धी या आपल्या मूळ गावी परतले. किसन यांना सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात मदत व्हावी म्हणून किसनने शिक्षण सोडून नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी सुरुवातीस दादरजवळ फुले विकली व नंतर स्वतःचेच दुकान थाटले व आपल्या दोन भावांना राळेगण सिद्धीहून बोलावले. 
 
लष्करी सेवा 
इ.स. १९६२च्या सुमारास चीनने भारतावर आक्रमण केलेले असताना भारतीय सैन्याने धडाक्यात भरती सुरू केली होती. त्यावेळी २५ वर्षांचे असलेले हजारे लष्कराच्या किमान शारीरिक क्षमतेस पात्र नव्हते, पण कोणत्याही परिस्थितीत नवीन जवान भरती करणे आवश्यक असल्याने लष्कराने त्यांना भरती करून घेतले. औरंगाबाद येथे सुरुवातीचे प्रशिक्षण घेतल्यावर १९६३मध्ये त्यांना वाहनचालकाचे पद दिले गेले. 
 
त्यानंतर दोन वर्षातच पाकिस्तानने भारतावर चाल केली. त्यावेळी हजारेंचा मुक्काम पंजाबमधील खेमकरण क्षेत्रात होता. नोव्हेंबर १२, इ.स. १९६५ रोजी पाकिस्तानी वायुसेनेने भारतीय ठाण्यांवर हल्ले सुरू केले. हजारे त्यावेळी इतर वाहनांसह आपले वाहन चालवीत होते. या हल्ल्यात त्या तांड्यातील ते स्वतः सोडून एकूणएक जवान शहीद झाले.  हे पाहून विषण्ण झालेल्या हजारेंनी जगण्यातील अर्थ शोधण्यास सुरुवात केली. आपण आपले उरलेले आयुष्य गरीबांची दुःखे दूर करण्यात घालवावे असे त्यांना वाटू लागले. यानंतर फावल्या वेळात त्यांनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि विनोबा भावे यांचे साहित्य वाचण्यास सुरुवात केली. यानंतर काही वर्षांनी १९७०च्या दशकात त्यांची मृत्यूशी पुन्हा एकदा जवळून गाठ पडली. वाहन चालवीत असताना भीषण अपघातातून ते बचावले.  या क्षणी त्यांना वाटले की आपल्या उरलेल्या आयुष्याचा सदुपयोग करण्यासाठी जणू काही दैवच त्यांना इशारे देत आहे. वयाच्या ३८व्या वर्षी किसन हजारेंनी आपले उरलेले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी वेचण्याचा संकल्प सोडला. १९७८मध्ये त्यांनी भारतीय लष्कराचा राजीनामा दिला. 
 
राळेगण सिद्धी 
लष्कर सोडल्यावर हजारे राळेगण सिद्धी या आपल्या मूळ गावी परतले हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात आहे. जवळजवळ कायमच्या दुष्काळी प्रदेशात असलेल्या या दुर्लक्षित गावात त्यावेळी गरिबी आणि निराशेचा सुकाळ होता. हजारेंनी ग्रामस्थांसह अनेक दशके अथक प्रयत्ना करून गावाचा कायापालट केला. आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी गावातील परिस्थिती सुधारली. तंत्रज्ञान किंवा औद्योगिकीकरणाचा आधार न घेता केवळ अतोनात कष्ट आणि सहकार यांवर त्यानी गावातील गरिबी दूर करण्यात यश मिळवले. 
 
आंदोलने आणि चळवळी
अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराचा निपटारा करण्याकरिता वेळोवेळी आंदोलने केली व प्रसंगी कारावासही स्वीकारला. १९८० पासून आतापर्यंत अण्णा हजारे यांनी १६ उपोषणे केली आहेत. प्रत्येक वेळी सरकारला त्यांच्यासमोर नमते घ्यावे लागले.त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.  अण्णाची १६ पैकी १३ उपोषणे ही महाराष्ट्र सरकारच्या विरोधातील तर ३ उपोषणे केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आली आहेत.
यांतील १५वे आणि १६वे उपोषण हे जनलोकपाल विधेयकासाठीचे होते. अण्णांनी एकूण आतापर्यंत ११६ दिवसापेक्षा जास्त काळ उपोषण केले आहे. अण्णाच्या या उपोषणांमुळे आणि आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारला ४५० अधिकार्यांउवर कारवाई करावी लागली तर ६ मंत्र्यांना आपले पद गमवावे लागले आहे.
 
१३व्या उपोषणाचे फलित
साल २०१० अण्णांनी १४ वे उपोषण केले ते सहकार चळवळीतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात, सहकार कायद्यात आमूलाग्र बदल करावे या मागणीसाठी,. ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्या यासाठी. १६ ते २० मार्च दरम्यान हे उपोषण झाले. सहकार कायदात सुधारणांची प्रक्रिया सुरू झाली. काही प्रमाणावर अण्णांना या उपोषणातही यश मिळाले.
 
आता वेळ होती अण्णांच्या १५ व्या उपोषणाची केंद्राला इशारा देऊनही सरकार जागे होत नव्हते, जनलोकपाल कायद्याच्या मंजुरीसाठी हे उपोषण होते, भ्रष्टाचाराच्या विरोधातले हे आंदोलन. साहजिकचं भ्रष्टाचाराने पोळलेल्या जनसामान्यांनी अण्णांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला. ५ ते ९ एप्रिल २०११ रोजी हे उपोषण दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावर झाले. सरकारवर वाढलेल्या दबावाने सरकारनेनं अण्णांशी बोलणी सुरू केली. कायद्याच्या मसुद्यासाठी सरकारच्या ५ मंत्र्यासह अण्णा आणि त्यांच्या सिव्हिल सोसायटीच्या ५ सदस्यासह जॉइन्ट ड्राफ्ट कमिटी http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/ स्थापन झाली अण्णानी उपोषण मागे घेतले.
 
भ्रष्टाचारविरोधलोकपाल कायदा 
दोन सप्टेंबर २०११ पर्यंत(म्हणजे एकूण पंधरा दिवस) उपोषणाला परवानगी देतानाच रामलीला मैदानाचा काही भाग आंदोलनासाठी, तर काही भाग वाहनतळ म्हणून वापरण्याची अटही यात मान्य करण्यात आली होती. प्रशासनातर्फे रामलीला मैदानावर साफसफाई केली गेली. जयप्रकाश नारायण पार्कसारख्या छोट्या जागेऐवजी रामलीला मैदानासारखी मोठी जागा अण्णांना आंदोलनासाठी मिळाली. जयप्रकाश नारायण पार्कमध्ये केवळ पाच हजार आंदोलकांनाच परवानगी दिली जाणार होती, रामलीला मैदानात जागा भरेल इतक्याप आंदोलकांना सहभागी होण्याची परवानगी मिळाली. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली, चंदीगड, बंगळूर, चेन्नई, मुंबई, पुणे, कोलकता या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. दिल्लीमध्ये जंतर-मंतर व इंडिया गेट परिसरात आंदोलकांची गर्दी झाली होती. तिहारच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी होती आणि ते अण्णा हजारे तुरुंगाबाहेर येण्याची वाट पाहत होते. विविध राज्यांमध्ये झालेल्या आंदोलनांत तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. देशभरात गावोगावी, शहरांमध्ये निदर्शने, मोर्चे, रॅली, 'कॅन्डल मार्च' काढून लहान मुलांपासून ते तरुण, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा समाजाच्या सर्व थरांतील घटकांनी अण्णांच्या आंदोलनाला भरभक्कम पाठिंबा व्यक्त केला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती