फेसबुकमुळे महिलांमध्ये नकारात्मक भावना वाढते

बराच वेळ फेसबुक वापरणार्‍या महिलांना फेसबुकवरील इतर महिलांचे फोटो पाहून स्वत:मध्ये कमतरता आहे असे वाटायला लागते, असा धक्कादायक निष्कर्ष अमेरिका आणि ब्रिटनमधील विद्यापीठांनी केलेल्या एका संयुक्त संशोधनाद्वारे समोर आला आहे. सिअँटलमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत हा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला. हे संशोधन इंग्लंडमधील स्ट्रेथक्लेड विद्यापीठ आणि अमेरिकेतील आयोवा आणि ओहायो विद्यापीठात करण्यात आले आहे.

त्यासाठी कॉलेजात जाणार्‍या 881 तरुणींचा फेसबुक वापर, त्यांच्या खाद्य आणि व्यायामाच्या सवयी यांचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनात सामील असलेल्या संशोधिका पिटी एकलर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक बराच काळ वापरणार्‍या महिला स्वत:च्या शरीरयष्टीची तुलना फेसबुकवरील इतर महिलांच्या फोटोंशी करतात. इतर फोटो अधिक सरस असल्याचे वाटून त्यांच्यामध्ये स्वत:बद्दल नकारात्मक भावना वाढीस लागते. ‘महिला जितका अधिक वेळ फेसबुक वापरतात, तितकी त्यांच्यामध्ये नकारात्मक भावना बळावते. त्याचप्रमाणे ज्या महिलांना स्वत:चे वजन कमी करायचे आहे, त्या महिला फेसबुकवर इतर महिलांच्या वेशभूषा आणि देहबोलीकडे जास्त लक्ष देऊन पाहतात,’ असेही पेटी यांनी सांगितले. स्वत:च्या देहाविषयी नकारात्मकता निर्माण झाल्यास खाण्याविषयी अनास्था निर्माण होते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. सोशल मीडियाचा अशा पद्धतीने वापर होत असल्यास ते अत्यंत धोकादायक आहे,  असेही संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा