थ्रीडीपासून मुलांना धोका

सोमवार, 11 मे 2015 (11:16 IST)
पॅरिस- आजकाल थ्री डी तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या चित्रपटांची बरीच चलती असून, सिनेमागृहात जाण्यासोबतच घरातही थ्री डी गॉगल्स घालून टीव्ही पाहणार्‍यांची संख्या वाढत आहे. परंतु फ्रान्सच्या सरकारी संस्थेनुसार थ्री डी सिनेमांमुळे मुलांच्या दृष्टीवर परिणाम होत असल्याने बालकांकरिता अशा सिनेमांवर बंदी घातली पाहिजे.
 
फ्रान्सची राष्ट्रीय आयोग आणि सुरक्षा संस्था अँन्सेस ने थ्रीडी चित्रपटांचा मुलांवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करून सरकारला एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार लहान मुलांची वाढत्या वयासोबत दृष्टी विकसित होत जाते. बाल्यावस्थेत डोळ्यांनी बघून उंची, खोलीचा अंदाज लावण्याच्या दिशेने मेंदू काम करत असतो. मात्र, थ्री डी सिनेमांमुळे मुलांच्या या दृष्टी विकासावर विपरीत परिणाम होतो, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 
थ्री डी तंत्रज्ञानाने बनवलेले सिनेमे पाहताना पडद्यावरील दृश्यासोबत आपण अशा प्रकारे जोडले जातो की, आपण त्या ठिकाणी असल्याचा आभास निर्माण होतो आणि त्यामुळे आपला खोली, उंचीचा अंदाज चुकतो. या सर्व 
 
गोष्टींचा विचार करता सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी थ्री डी सिनेमे पाहू देऊ नयेत, अशी शिफारस अँन्सेस ने सरकारकडे केली आहे. 13 वर्षांखालील मुलांनाही असे सिनेमे नियमित न बघता क्वचितच बघावेत, असेही अँन्सेस ने म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा