कुशल संघटक, चतुरस्त्र राजकारणी

वेबदुनिया

सोमवार, 26 एप्रिल 2010 (18:43 IST)
MH Govt
MH GOVT
राजस्थानच्या राज्यपाल प्रभा राव यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक चतुरस्त्र राजकारणी आणि कुशल संघटक गमावला आहे. विद्यार्थी जीवनापासूनच राजकारणात उतरलेल्या प्रभाताईंनी आतापर्यंत अनेक पदे भूषवली.

प्रभाताईंचा जन्म चार मार्च १९३५ मध्ये मध्य प्रदेशातील खांडवा येथे एका स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबात झाला. हे कुटुंब सुधारकी विचारांचे होते. म्हणूनच त्यांच्यातर्फे बांधल्या गेलेल्या मंदिरात आणि पाणपोयांत दलितांनाही प्रवेश असे.

प्रभाताईंनी राज्यशास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतले. भारतीय शास्त्रीय संगीतातही त्यांनी पदव्यूत्तर डिप्लोमा केला होता. खेळातही त्यांना रूची होती. सांस्कृतिक बाबींमध्येही रस होता. विद्यापीठीय जीवनात त्यांनी या बाबींकडेही आवर्जून लक्ष दिले होते.

पुढे वर्ध्यात येऊन त्यांनी आपल्या राजकीय कर्तृत्वाला वाव दिला. त्यातूनच त्यांना विधासभेवर जायची संधी मिळाली. १९९३-९५ या काळात त्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा हो्तया. १९७२-९० पर्यंत त्यांनी राज्य सरकारमध्ये वित्त, सहकार, पर्यटन, शिक्षण आदी अनेक खात्यांची मंत्रिपदे भूषवली. १९७९ मध्ये तर त्या विरोधी पक्षनेत्या होत्या. १९९९ मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून गेल्या.

याच काळात संघटनात्मक पातळीवरही त्यांना मोठमोठी पदे भूषविण्याची संधी मिळाली. १९८५-९० दरम्यान त्या कॉंग्रेसच्या विधीमंडळ दलाच्या उपनेत्या, केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्य, अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष व अखिल भारतीय कॉंग्रेसचे उपाध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. पंजाब, आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील प्रभारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

मेक्सिकोत १९७५ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला वर्षात तसेच १९९३ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दशकानिमि्त संयुक्त राष्ट्रसंघातर्फे झालेल्या संमेलनात भारतीय प्रतिनिधी मंडळाचे प्रतिनिधीत्व केले होते.

कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदानंतर म्हणजे १९ जुलै २००८ रोजी त्यांची नियुक्ती हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी झाली होती. याच वर्षी २५ जानेवारी २०१० ला त्या राजस्थानच्या राज्यपाल बनल्या होत्या.

वेबदुनिया वर वाचा