कुणी पाणी देता का पाणी?

बुधवार, 27 एप्रिल 2016 (12:41 IST)
रामा लहान असतानाच तचे आईवडील अपघातात गेले होते. रामाचा सांभाळ त्याची  आजी करत होती. तो आजीलाच आई म्हणायचा.
 
‘अगं आई गं!’ रामा विव्हळत होता. कण्हत होता. ‘अगं आई मी आज शाळंत न्हाई जानार बग.’
 
‘का रं बाबा?’ ‘आई! माजं अंग लई दुकतं बग.’ ‘थांब! मी जरा तुजं हातपाय चेपून देते’ असं म्हणून रामूची आजी रामूजवळ गेली. त्याच्या अंगाला हात लावला आणि म्हातारी चपापलीच. रामूचं अंग आजही तापानं फणफणलं होतं. रामूच्या घशाला कोरड पडली होती. ‘पन पोरा, घरात पाणचा ठिपूस बी न्हाई रं!’ ‘तू त्या दिवशी आनलेलं दोन घागरी पाणी मी पुरवून पुरवून वापरलं बग. पोरा शाळंत नगं जाऊस पर त्या पाटलाच्या मळ्यातल्या विहिरीची घागर तरी भरून आण रं. ते पाणी बी खूप खोल गेलंय म्हनत्यात. पाण्यानं विहिरीचा तळच गाठलाय. पन माज सोन, पोहर्‍यानं थोडं थोडं निघल तसं काढून एक घागर तरी आन. मला म्हातारीला आता एवढय़ा लांबून पाणी आणणं होत न्हाई रं. जा राजा, तेवढी घागर आन. मंग पानी पी अन् नीज. नगं जाऊ शाळंला. चार दिवस तुज्या अंगात ताप मुरतो. पर औषधाला पैसा बी न्हाई रं!’
 
रामा पाणी आणणसाठी हळूहळू उठला पण लगेच धाडकन खाली पडला. म्हातारी घाबरली, ओरडली. शेजारच्या आयाबाया सगळ्यात तिच्या घरी आल्या. रामाची अवस्था बघून सगळ्याजणी म्हातारीला डॉक्टरकडे जायचे सल्ले द्यायला लागल्याल. ‘बाई गं! कसलं खेळतं लेकरू? कसं का झालं वो याला?’ एकमेकीत चर्चा सुरू झाली. पाण्याच्याही गप्पा सुरू झाल्या. ‘वानीकेनीची पाटलाची विहीर होती. ती बी आटली. शेतीभाती तर समद्यांची पाण्या पावसाविना गेलीच पण आता तर प्यायला पानी बी मिळंना बगा.’
 
रामू ‘पाणी, पाणी’ करत होता. रामूचं डोकं म्हातारीनं मांडीवर घेतलं अन् केविलवाण्या  आवाजात म्हातारी म्हणत होती, ‘कुणी पाणी देता का पाणी माझ्या पोराला! पोरगं आचके देतं वो! घोटभर तरी पाणी द्या पोराला! सगळ्या बायका नुसतं एकमेकींकडे पाहात होत. तेवढय़ात बाहेर पोरं ओरडत होती. ‘पाणचा टँकर आला रे, चला घागरी घेऊन, नंबर लावायला’ सगळ्या बायका पटापटा उठून गेल्या. ‘दोन दोन घागरी तरी पाणी मिळावं बा. पुन्हा कवा टँकर येईल सांगता येत न्हाई’ असं म्हणत घाईघाईनं निघून गेल्या. इकडे पाणी पाणी म्हणत रामूनं म्हातारीच मांडीवर प्राण सोडला. म्हातारीनंही रामूला मांडीवरून खाली ठेवलं अन् लहानशी कळशी घेऊन ती टँकर शोधत निघाली. पाण्याच्या शोधात निघाली. पाणला ‘जीवन’ नाव सार्थ आहे ना!
 
मंदाकिनी डोळस

वेबदुनिया वर वाचा