विराट कोहलीसोबत भांडण का झालं, नवीन उल हकने सांगितला मैदानावरचा घटनाक्रम

बुधवार, 14 जून 2023 (22:45 IST)
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत भारताचा भरवशाचा फलंदाज विराट कोहली आणि अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू नवीन-उल-हक यांचा वाद प्रचंड गाजला होता.
 
या वादानंतर सोशल मीडियावर दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं. नवीन-कोहलीमध्ये वाद नेमका का झाला, कोण चूक, कोण बरोबर याबाबत विविध तर्कवितर्क करण्यात येत होते.
 
मात्र, नेमकं काय घडलं आहे, याबाबत स्पष्ट माहिती अद्याप मिळालेली नव्हती.
 
अखेर, आयपीएल स्पर्धा संपून दोन आठवडे उलटल्यानंतर गोलंदाज नवीन-उल-हकने या प्रकरणातील आपली बाजू बीबीसीशी बोलताना स्पष्ट केली आहे.
 
कोहलीसोबत झालेल्या वादावर बोलताना नवीन-उल-हक म्हणाला, “मी कुणाला चुकीचं काही बोलत नाही, तसंच इतरांकडून चुकीचं बोलून घ्यायलाही मला आवडत नाही.”
 
या वादानंतर विराट कोहलीसोबत पुन्हा भेट झाली नाही, असंही नवीनने म्हटलं.
 
गेल्या महिन्यात 1 मे रोजी आयपीएल स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात क्रिकेट सामना खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान मैदानात विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यात बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं.
 
हे नाट्य इथेच थांबलं नाही. तर खेळ संपल्यानंतर खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतात, त्यावेळीही भांडण सुरूच होतं.
 
कोहली समोर येताच नवीन-उल-हकने त्याचा हात झटकल्याचं टीव्हीवर दिसलं. त्यानंतर लखनौ संघाचा मेंटॉर गौतम गंभीर हासुद्धा यानेही दोघांच्या वादात उडी मारली. यानंतर दोघांमध्येही भांडण झाल्याचं पाहायला मिळालं.
आयपीएल प्रशासनाने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यावर 100 टक्के मॅच-फी चा दंड ठोठावला. तर नवीन-उल-हकवर 50 टक्के दंड लावण्यात आला.
 
याबाबात गौतम गंभीरने नुकतेच न्यूज 18 न्यूज चॅनेलसोबत चर्चा केली होती.
 
गंभीर म्हणाला, “या प्रकरणात नवीन-उल-हक त्याच्या ठिकाणी बरोबर होता. त्यामुळे मी त्याची बाजू घेतली. हे फक्त नवीनच्याच बाबतीत नाही. तर जो कुणीही बरोबर असेल, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याची बाजू घेईन.”
 
गोलंदाजीदरम्यान नवीनने काय म्हटलं?
या वादावर गंभीरने माहिती दिली असली तरी नवीन-उल-हकने या वादासंदर्भात काहीही चर्चा केली नव्हती.
 
बीबीसीशी बोलताना नवीन-उल-हकने पहिल्यांदा यासंदर्भात आपली बाजू स्पष्ट केली आहे.
 
नवीन म्हणाला, “खेळादरम्यान आणि नंतरही या वादाची सुरुवात मी माझ्या बाजूने केलीच नाही. खेळ संपल्यानंतर मी हस्तांदोलन करण्यासाठीही गेलो होतो. पण त्यावेळी विराटने ते सुरू केलं. मॅच रेफ्रीही त्यावेळी तिथे होते. त्यांनी जी दंडाची शिक्षा लावली आहे, त्यावरून हे कुणी सुरू केलं, याबाबत स्पष्ट होतं.”
नवीन म्हणतो, “साधारपणपणे मी स्लेजिंग कधीच करत नाही. कधीकधी गोलंदाजीदरम्यान करतो, पण त्यादिवशी मी कोहलीला एका शब्दानेही काही बोललं नव्हतं. क्रिकेट खेळणं सुरू केल्यापासून मैदानावर मी कधीच कुणाला काही बोललेलं नाही. पण जर कुणी माझ्या नादी लागतं तर मी त्याचं उत्तर देतो.”
 
तो म्हणाला, “दुसऱ्या बाजूने मला कुणी डिवचलं तर मी नक्कीच त्याचं उत्तर देईन. ही माझी चूक म्हणा, किंवा काहीही म्हणा. ही माझी सवयच आहे. समोरचा खेळाडू छोटा असेल किंवा मोठा स्टार. मी अफगाणिस्तानसाठी खेळत असो किंवा एखाद्या क्लबसाठी, प्रत्येक ठिकाणी माझी भूमिका तीच असते. मी चुकीचं बोलत नाही आणि बोलूनही घेत नाही.”
 
नवीनने संयम पाळण्याची गरज होती, असं अनेकांनी त्यावेळी म्हटलं होतं, त्याला उत्तर देताना तो म्हणाला, “तिथे उपस्थित असलेल्या खेळाडूंनी पाहिलं की मी किती संयम पाळला होता. मी बॅटिंगसाठी गेलो तेव्हा काय झालं, इंटर्व्हलदरम्यान काय चर्चा झाली, माझी प्रतिक्रिया चित्रित करण्यात आली आणि सोशल मीडियावर दाखवण्यात आली.”
 
हात झटकणं आणि इन्स्टाग्रामवर आंब्यांचा फोटो
हात मिळवताना त्यादिवशी नेमकं काय झालं होतं, या प्रश्नाचं उत्तर देताना नवीन-उल-हकने सांगितलं, “सामन्यानंतर हात मिळवताना विराटने काय म्हटलं, याचे व्हीडिओ आहेत. मी दुसऱ्या खेळाडूच्या दिशेने चाललो होतो, त्यावेळी त्याने माझा हात पकडला. त्याने असं केलं, मग मीसुद्धा माणूसच आहे, मी प्रतिक्रिया देणारच.”
 
या घटनेनंतर प्रेक्षकांसह सोशल मीडियावर गदारोळ माजला. या वादाचा आपल्या कामगिरीवर परिणाम झाला का, या प्रश्नाचं उत्तरही नवीनने दिलं.
तो म्हणाला, “हो, निश्चितच त्याचा परिणाम झाला. लोकांना कसं शांत करावं, याचा मी विचार करत होतो. पण माझं लक्ष मी खेळावर केंद्रीत केलं, मला स्वतःवर विश्वास होता. सोशल मीडियावर गोंधळ सुरू होता. मी स्वतःला समजावलं की मी इतका दूर खेळण्यासाठी आलेलो आहे. काहीही झालं तरी मला नीट खेळावंच लागणार आहे.”
 
त्यानंतर नवीनने आंबा खातानाचा एक फोटो इन्स्टाग्रॅमवर टाकला होता. त्यावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या.
 
हा नवीन-उल-हकचा वाद वाढवण्याचा आणि ताणण्याचा प्रयत्न होता का?
 
या प्रश्नाचं उत्तर देताना नवीन म्हणाला, “मी हा वाद सोशल मीडियावर नेण्याचा प्रयत्न केला नाही. तिथे आधीपासूनच प्रचंड गदारोळ सुरू होता. माझ्या खेळाबाबत बोललं गेलं. पण मी सोशल मीडियावर कुणाचंच नाव घेतलं नाही. मी फक्त आंबा खाण्याचा आनंद घेतला.”
 
नवीन पुढे म्हणतो, “पुन्हा अशा परिस्थितीशी माझा सामना झाल्यास माझं उत्तर तसंच असणार आहे.”
 
नवीन-उल-हकचे आधीचे वाद
नवीन-उल-हकचा हा मैदानावरचा पहिला वाद नाही.
 
यापूर्वी लंका प्रीमिअर लीगमध्ये 2020 साली एका सामन्यात नवीन-उल-हक पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद आमिर याच्याविरुद्ध भिडला होता.
या वादानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीर आफ्रिदी त्याला समजावताना दिसला होता.
 
सामन्यानंतर आफ्रिदी आणि नवीन यांचा व्हीडिओ स्काय स्पोर्ट्सने ट्विट केला. तो व्हीडिओ रिट्विट करताना आफ्रिदीने म्हटलं, “सामना खेळ आणि अभद्र भाषेचा वापर करू नको, असा माझा नवीन-उल-हकला सल्ला होता.”
 
शाहीद आफ्रिदीच्या या ट्विटनंतर नवीनने ट्विटरवर त्याचं उत्तर दिलं, “इज्जत द्या, इज्जत घ्या.”
 
नवीन उल हक कोण आहे?
सप्टेंबर 1999 मध्ये काबुलमध्ये जन्मलेला नवीन उल हक अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज आहे.
 
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये लखनौ सुपरजायंट्सकडून खेळतो. नवीन उल हक अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघासह अफगाणिस्तानच्या अंडर 16, अंडर 19, अंडर 23 आणि अफगाणिस्तान-ए यांसाठीही खेळला आहे.
 
नवीन उल हक लंका प्रीमियर लीगमध्ये कोलंबो स्टार्स आणि कँडी टस्कर्सकडून खेळला होता. त्याचसोबत पाकिस्तान सुपर लीगमध्ये नवीन उल हक क्वेटा ग्लॅडिएटर्ससाठी खेळला होता.
 
नवीन उल हक ऑस्ट्रेलियाची देशाअंतर्गत क्रिकेट लीग बिग बॅश लीगच्या सिडनी सिकर्स टीमसोबतही जोडला गेला होता. नवीन बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये सिल्हट थंडर्सचाही भाग आहे.
 
नवीनने आतापर्यंत 7 वनडे सामने खेळले असून, त्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत. आतापर्यंत 27 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले असून, त्यात 34 विकेट्स घेतल्या आहेत.
 
इंडियन प्रीमियर लीगमध्ये लखनौ सुपरजायंट्सकडून खेळण्याआधी नवीन उल हक पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळत होता.
 


Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती