भारतीय क्रिकेटमध्ये भविष्यात 'हे' 5 जण ठरू शकतात सुपरस्टार

शनिवार, 27 मे 2023 (20:38 IST)
आयपीएल 2023 च्या हंगामात भारताच्या 'अनकॅप्ड' खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे.
खरं तर इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल हे या 'अनकॅप्ड' खेळाडूंसाठी चांगलं व्यासपीठ आहे. या हंगामात अशाच काही नव्या खेळाडूंनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय.
 
क्रीडा लेखक सात्विक बिस्वाल यांनी या लेखातून अशाच पाच आश्वासक खेळाडूंच्या कामगिरीचा आणि प्रवासाचा आढावा घेतलाय.
 
1. रिंकू सिंग
यंदाच्या आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) 7 व्या स्थानावर आली असली तरी या हंगामात रिंकू सिंगचं नाव चर्चेत होतं. जेव्हा तो क्रीजवर यायचा तेव्हा संघाचे आणि सोबतच त्याच्या चाहत्यांचे डोळे तो मॅच कसा फिनिश करतो याकडे लागून राहिलेले असायचे. आणि काही अटीतटीच्या सामन्यांमध्ये त्याने चमकदार कामगिरी देखील केली.
 
असाच कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यातला सामना रोमहर्षक ठरला होता. गुजरात टायटन्सचा लेगस्पिनर राशिद खानने कोलकात्याची धावसंख्या गाठून सामना उलटवत आणला होता. मात्र रिंकू सिंगच्या शानदार खेळीमुळे कोलकात्याला विजय मिळाला.
 
सामन्याच्या शेवटच्या षटकात कोलकत्याला विजयासाठी 29 धावांची गरज होती. गुजरात टायटन्सचा यश दयाल लास्ट ओव्हर टाकत होता. यावेळी रिंकू सिंग कोलकात्यासाठी क्रीजवर होता. रिंकूने यश दयालच्या शेवटच्या षटकात सलग पाच षटकार ठोकत कोलकात्याला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
 
आयपीएल 2022 च्या मेगा-लिलावापूर्वी 25 वर्षीय रिंकूला केकेआरने 55 लाख रुपयांना विकत घेतले होते.
 
आयपीएल 2022 मध्ये, रिंकू सिंगने 7 सामने खेळले असून त्यात त्याने 34.8 च्या सरासरीने 174 धावा केल्या आहेत. आणि त्याचा स्ट्राइक-रेट 148.71 होता.
 
या सिझन मध्ये त्याने ग्रुप स्टेजवर प्रत्येक सामना खेळला आणि जवळपास 59.25 च्या सरासरीने 474 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 150 होता.
 
रिंकूने उत्तरप्रदेशकडून जवळपास 100 सामने खेळले आहेत. या हंगामात त्याने केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्याला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळण्याची शक्यता दिसून येत आहे.
 
2. तिलक वर्मा
इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून टीम इंडियाला अनेक नवे आणि प्रतिभावंत खेळाडू दिले आहेत. आयपीएलच्या या हंगामात तिलक वर्माने आपल्या फलंदाजीने लोकांना स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं.
 
एखाद्या अवघड परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे मुंबई इंडियन्सची मधली फळी मजबूत झाली आहे.
 
तिलक वर्माला थोडी दुखापत झाली असल्याने तो या हंगामाच्या उत्तरार्धात खेळू शकला नव्हता. पण त्याने या हंगामातील 9 सामन्यात फलंदाजी करताना 45.67 च्या सरासरीने 158.38 च्या स्ट्राइक रेटने 274 धावा केल्या.
 
मुंबई इंडियन्सच्या संघाने या लिलावात 1.70 कोटी रुपये मोजत तिलकला आपल्या संघात दाखल करून घेतलं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो हैदराबाद संघाचं प्रतिनिधीत्व करतो. भविष्यात तो टीम इंडियात दाखल झाला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.
 
माजी खेळाडू आणि भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं होतं की, "पुढच्या सहा ते आठ महिन्यांत तो भारताच्या टी-20 क्रिकेट संघात सामील होईल. पण जर तसं झालं नाही तर मात्र मला आश्चर्य वाटेल."
 
"तो परिपक्व आहे, त्याच्या स्वभावातच तो गुण आहे. तो भारतीय संघाच्या मधल्या फळीत चांगली कामगिरी करेल यात शंका नाही."
 
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही तिलक वर्माचं कौतुक केलं होतं. रोहित शर्मा म्हणाला होता की, "त्याचा खेळाबाबतचा दृष्टिकोन मला आवडतो. तो कोणत्याही परिस्थितीत घाबरत नाही."
 
"तो गोलंदाज म्हणून खेळत नसतो, तो बॉलशी खेळतो असं वाटतं. आणि त्याच्या वयात तो ज्या पद्धतीने खेळतोय, त्याचीच खरी गरज आहे."
 
3. यशस्वी जयस्वाल
क्रिकेटपटू होण्याच्या वेडाने झपाटलेला यशस्वी वयाच्या 12 व्या वर्षी उत्तरप्रदेशहून मुंबईत आला. तो अनेक महिने मुंबईच्या रस्त्यावर पाणीपुरी विकायचा आणि तिथल्याच तंबूत झोपायचा. याच आझाद मैदानावर असलेल्या एका क्रिकेट प्रशिक्षकांनी त्याला क्रिकेट खेळताना पाहिलं आणि तेव्हापासून यशस्वीचे दिवस बदलले.
 
यावर्षी 21 वर्षीय डावखुऱ्या यशस्वीने राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर म्हणून तुफान विजय मिळवला. संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नसला तरी यशस्वी जयस्वालने 14 सामन्यात 48.08 च्या सरासरीने आणि 163.61 च्या स्ट्राईक रेटने 625 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने पाच अर्धशतके आणि एक शतक झळकावलं आहे.
 
यशस्वीने एका आयपीएल मोसमात अनकॅप्ड प्लेअर म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा बहुमान मिळवलाय. त्याने 13 चेंडूत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकही ठोकलंय.
 
4. तुषार देशपांडे
आयपीएलच्या या हंगामात मराठमोळा तुषार देशपांडे चेन्नई सुपर किंग्स संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. 2022 मध्ये चेन्नई संघाने तुषारला केवळ दोन सामन्यांत खेळण्याची संधी दिली होती. ज्यामध्ये तो एक विकेट घेण्यात यशस्वी ठरला होता.
 
पण तुषार कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या अपेक्षेप्रमाणे खरा ठरला. या हंगामात त्याने श्रीलंकेचा गोलंदाज मथीशा पाथिरानासोबत चांगली भागीदारी केली. शिवाय या मोसमातल्या सर्व सामन्यांमध्ये त्याला खेळायची संधी मिळाली.
 
एक गोलंदाज म्हणून त्याची किंवा त्याच्या वेगाची भीती वाटत नाही. तो त्याच्या क्षमतेवर आणि योजनेवर काम करतो. पहिल्या काही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी म्हणावी तशी नव्हती. पण संघ व्यवस्थापन आणि धोनीने दिलेल्या पाठिंब्यामुळे तो सीएसकेसाठी आतापर्यंतचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.
 
28 वर्षीय तुषारने 16 व्या मोसमात चेन्नईकडून आतापर्यंत सर्वाधिक 5 विकेट घेतल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा अनुभव गाठीशी असणारा तुषार, अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विश्वचषकासाठी भारतीय संघासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
 
5. जितेश शर्मा
पंजाब किंग्जच्या यष्टिरक्षक-फलंदाज असलेल्या जितेश शर्मानं यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 12 सामने खेळलेत. यात आतापर्यंत 163.63 च्या स्ट्राइक रेटनं 234 धावा केल्या आहेत.
 
यावर्षी जितेश शर्माने आपल्या फलंदाजीने क्षमतेने दमदार कामगिरी केली. तो या हंगामात संघासाठी तिसरा सर्वाधिक धावा करणारा (309 धावा) खेळाडू ठरला आहे.
 
आयपीएलपूर्वी जितेश शर्मा भारताच्या टी ट्वेन्टी संघाचा भाग होता पण त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नव्हती.
 
त्याच्या खेळातील सातत्य आणि धडाकेबाज फलंदाजीमुळे त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता.
 
त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 60 पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. विदर्भाच्या संघातील 29 वर्षीय जितेशने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतक झळकावलं होतं.
 
त्यामुळे भारतीय संघासाठी तो चांगला पर्याय ठरू शकतो.
 


Published By -Priya DIxit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती