धोनी म्हणतो, चेन्नईत येत राहीन खेळाडू म्हणून किंवा...
बुधवार, 24 मे 2023 (10:42 IST)
“मी चेन्नईत येत राहीन खेळाडू म्हणून किंवा अन्य काही म्हणून. आयपीएलच्या पुढच्या हंगामात खेळणार की नाही हे ठरवायला 8-9 महिने आहेत. माझ्याकडे भरपूर वेळ आहे. डिसेंबरमध्ये मिनी ऑक्शन होईल. मी सीएसकेसाठी येत राहीन. जानेवारीपासून मी घरापासून दूर आहे. मार्चमध्ये सरावाला सुरुवात केली. स्पर्धा संपेपर्यंत मे महिन्याची अखेर होईल. दोन महिने खेळत राहणं सोपं नाही. बघूया कसं होतंय”, असं महेंद्रसिंग धोनीने सांगत चाहत्यांना कोड्यात टाकलं. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने अंतिम फेरी गाठली. त्यानंतर धोनी बोलत होता. धोनी 2008 पासून म्हणजेच आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नईचं नेतृत्व करतो आहे. हा हंगाम धोनीचा शेवटचा असेल असं अंदाज चाहत्यांनी बांधला आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने दिमाखात दहाव्यांदा आयपीएल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. मंगळवारी झालेल्या क्वालिफायर1च्या लढतीत चेन्नईने गुजरात टायटन्सवर 15 धावांनी विजय मिळवला. गेल्या वर्षी गुणतालिकेत तळाशी गेलेल्या चेन्नईची ही भरारी त्यांच्या चाहत्यांसाठी हुरुप वाढवणारी आहे.
गतविजेच्या गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विदर्भचा शिलेदार दर्शन नालकांडेने ऋतुराजला बाद केलं. मात्र त्याचा आनंद अवघी काही सेकंद टिकला कारण तिसऱ्या पंचांनी हा चेंडू नोबॉल दिला.
या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवत ऋतुराजने डेव्हॉन कॉनवेच्या साथीने 87 धावांची दमदार सलामी दिली. फलंदाजीसाठी आव्हानात्मक खेळपटटीवर ही सलामीची भागीदारी चेन्नईसाठी महत्त्वाची ठरली. मोहित शर्माने ऋतुराजला बाद करत ही जोडी फोडली. तडाखेबंद फटकेबाजीसाठी प्रसिद्ध शिवम दुबेने नूर अहमदने तीन चेंडूतच माघारी धाडलं.
अनुभवी अजिंक्य रहाणे 10 चेंडूत 17 धावांची उपयुक्त खेळी करुन परतला. एका बाजूने किल्ला लढवणाऱ्या कॉनवेला मोहित शर्माने बाद केलं. कॉनवेने 44 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकारासह 60 धावांची खेळी केली. अंबाती रायुडूने 9 चेंडूत 17 तर रवींद्र जडेजाने 16 चेंडूत 22 धावांची खेळी केली.
चेन्नईने 172 धावांची मजल मारली. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर दर्शन नालकांडे, रशीद खान आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.
या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने वृद्धिमान साहाला झटपट गमावलं. त्याने 12 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याला धोनीच्या चतुराईने चकवलं. तीक्ष्णाच्या गोलंदाजीवर कट करण्याचा हार्दिकचा प्रयत्न जडेजाच्या हातात जाऊन विसावला. दासून शनकाने 16 चेंडूत 17 धावा केल्या पण जडेजाच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विपचा त्याचा प्रयत्न तीक्ष्णच्या हातात गेला.
यानंतर जडेजाच्या अफलातून फिरकीसमोर डेव्हिड मिलर अचंबित झाला. मिलरसारख्या अनुभवी खेळाडूला माघारी धाडत जडेजाने गुजरातच्या डावाला खिंडार पाडलं. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात दीपक चहरचा धीमा उसळता चेंडू शुबमन गिलने खेळला पण तो अपेक्षित अंतर गाठू शकला नाही. डेव्हॉन कॉनवेने झेल टिपत गिलची खेळी संपुष्टात आणली. गिलने 38 चेंडूत 42 धावांची खेळी केली. राहुल टेवाटियाकडून गुजरातला अपेक्षा होत्या पण तीक्ष्णाच्या फिरकीसमोर तो निरुत्तर ठरला. त्याला 3 धावाच करता आल्या.
सातत्याने साथीदार बाद होत असतानाही रशीद खानने आक्रमणाचा मार्ग पत्करला. रशीद चेन्नईची मैफल खराब करणार असं वाटूही लागलं होतं. पण पथिराणाने विजय शंकरला तर अचूक धावफेकीने दर्शन नालकांडे बाद झाला आणि रशीदच्या आशाही मावळल्या. तुषार देशपांडेने रशीदला बाद केलं. त्याने 16 चेंडूत 30 धावांची खेळी केली. गुजरातचा डाव 157 धावांत आटोपला. चेन्नईतर्फे दीपक चहर, महेश तीक्षणा, रवींद्र जडेजा आणि मथीशा पथिराणा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
28 तारखेला अंतिम लढतीत चेन्नईचा मुकाबला लखनौ, मुंबई किंवा गुजरात यांच्यापैकी कोणाशी होतो हे पाहणं रंजक असेल. 60 धावांची खेळी करणाऱ्या ऋतुराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.