बऱ्याचदा तुम्हाला मिळणारं यश केवळ तुमच्या कामगिरीवर अवलंबून नसतं. तुमच्या यशात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचीही महत्त्वाची भूमिका असते. जग तुमच्यावर नाही तर तुमच्या प्रतिमेवर प्रेम करतं. ही प्रतिमा तुमची क्षमता आणि व्यक्तिमत्व या दोन्हींमुळे तयार होते.
तुमच्या व्यक्तिमत्वात एक्स फॅक्टर असेल तर नुसता षटकार ठोकून प्रतिमा बनवता येते, नाहीतर शतक झळकावून सुद्धा ते तयार होत नाही.
35 वर्षाच्या चेतेश्वर अरविंद पुजाराचं व्यक्तिमत्त्व शांत आणि सौम्य आहेच पण त्याच्या खेळामुळे त्याची प्रतिमा एक उत्कृष्ट क्रिकेटर अशी देखील तयार झाली आहे.
पण आक्रमक अशा क्रिकेटच्या जमान्यात त्याची प्रतिमा त्याच्यासाठीच मारक ठरलीय. मागच्या 13 वर्षांपासून बचावात्मक आणि संयमी फलंदाजी करण्याचे दिवस आता राहिले नाहीत.
पुजाराच्या बॅटमधून 'टक' ऐवजी 'टुक' असा आवाज येत राहिला आणि 'टॅटू' काढणारे फलंदाज त्याच्या पुढे गेले. समोरून येणारा चेंडू त्याच्या बॅटवर आदळून हवेऐवजी गवताला घासत बाउंड्री पार करतो.
टीम इंडियासाठी भिंत झालेला पुजारा
चेतेश्वर पुजाराने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत जवळपास 19 शतकं झळकावली. पण आजच्या पिढीत त्याचं कौतुक करणारे कमीच आढळतील.
यावरून तुम्हाला अंदाज बांधता येईल की जागतिक क्रिकेटमध्ये असे काहीच क्रिकेटपटू आहेत जे फक्त कसोटी सामने खेळतात. जगातील सर्वात लोकप्रिय आयपीएल क्रिकेट लीगमध्ये त्यांना कधीच पाय रोवता आले नाहीत.
त्याचे वडील आणि प्रशिक्षक अरविंद पुजारा हे माजी रणजी ट्रॉफी खेळाडू आहेत. सुरुवातीपासूनच चेतेश्वर दीर्घ खेळी आणि संयम या दोन्ही गोष्टींसाठी ओळखला जातो.
अंडर-14 मध्ये खेळत असताना त्याने इंग्लंडविरुद्ध त्रिशतक आणि अंडर-19 मध्ये द्विशतक झळकावलं होतं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की 2010 मध्ये कसोटी कॅप मिळाल्यानंतर पुजाराने मोठ्या खेळीमुळे सर्वात जलद 1000 धावा करण्याचा संयुक्त विक्रम केला होता. त्याला नंबर 3 वर खेळायला कोणी पाठवलं तुम्हाला माहित आहे का?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पुजाराने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली त्यावेळी त्याने चारच धावा काढल्या. दुसऱ्या डावात त्याला कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं.
पुजाराने बेंगळुरूच्या अवघड खेळपट्टीवर 72 धावा करत मालिका जिंकली. मात्र पुढच्याच वर्षी त्याला गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागलं. 2012 मध्ये पुजाराने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून जबरदस्त पुनरागमन केलं.
त्याचवर्षी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे नमतं घेतलं, पण पुजाराने मात्र याच सिरीज मध्ये एक शतक आणि एक द्विशतक झळकावलं.
2013 पर्यंत तरी तिसऱ्या क्रमांकाचा दावेदार पुजाराच होता. ऑस्ट्रेलियासोबतच्या मालिकेत त्याने 7 डावात 84 च्या सरासरीने 419 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जोहान्सबर्गच्या कठीण खेळपट्टीवर त्याने अवघड परिस्थितीतही 153 धावांची खेळी केली.
त्याच्या समोर डेल स्टेन, व्हेरॉन फिलँडर, मोर्ने मॉर्केल आणि जॅक कॅलिससारखे गोलंदाज होते.
चेतेश्वर पुजाराची कारकीर्द नवी उंची सर करत होती. पण 2014 मध्ये त्याच्या गुडघ्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागली. गुडघ्याच्या दुसऱ्या ऑपरेशननंतर 2014 मध्येच वनडे कारकीर्द संपल्यात जमा होती.
आता पुजारा केवळ कसोटीपटू बनूनच राहिला. पण चेतेश्वर पुजाराने राहुल द्रविडचा तिसऱ्या क्रमांकाचा वारसा पुढे नेला. 103 कसोटी सामन्यात 43.60 च्या सरासरीने 7195 धावा काढल्या, ज्यात 19 शतकं आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे.
यात एक विशेष गोष्ट म्हणजे पुजाराची सर्वोत्तम कामगिरी विराट कोहलीच्या काळात झाली. कोहली क्रिकेटचा आक्रमक ब्रँड म्हणून ओळखला जातो आणि त्याला त्याच्या संघाकडून पण स्फोटक फलंदाजीचीही अपेक्षा असते. पुजाराला संघात स्थान मिळणार नाही, असं वाटलं. पण 2016 ते 2019 हा पुजाराच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ होता. यादरम्यान त्याने 11 शतकं झळकावली.
ऑस्ट्रेलियात पहिली कसोटी मालिका जिंकल्याचं तुमच्या आठवणीत आहे का?
2018-19 च्या दरम्यान भारताने ऑस्ट्रेलियात 4 कसोटी मालिका जिंकल्या. या ऐतिहासिक विजयात पुजाराने 1258 धावा काढल्या आणि 3 शतकं झळकावली. यावेळी पुजारा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. त्यामुळे जेव्हा कसोटी क्रिकेटचा विषय निघतो तेव्हा पुजारासारख्या खेळाडूला विसरून चालत नाही.
2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेत एक किस्सा घडला होता.
जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्सच्या खेळपट्टीवर चेतेश्वर पुजाराने 53 व्या चेंडूवर आपलं खातं उघडलं. त्यावर प्रेक्षकांनीही देखील टाळ्या वाजवून त्याला दाद दिली. पुढे पुजारा 179 चेंडूत 50 धावांची खेळी खेळून बाद झाला. त्याच्या या संथ खेळावर जोरदार टीका झाली. पण भारताने हा कसोटी सामना जिंकला. भारताने ही मालिका 2-1 ने गमावली पण क्लीन स्वीपपासून संघ वाचला.
पण मग असं काय घडलं की बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यावरील 2 कसोटी मालिकेतून वगळलं?
तत्कालीन कारणाप्रमाणे असं म्हटलं जातं की, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पुजारा अपयशी ठरला होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 14 आणि 27 धावांची इनिंग खेळली होती. पण त्यावेळी इतर खेळाडू देखील अपयशी ठरलेच होते की, पुजाराला काढणं हास्यास्पद होतं. त्यावेळी रोहित शर्माने 15 आणि 43 आणि विराट कोहलीने 14 आणि 49 धावांची खेळी केली होती.
तसं बघायला गेलं तर मागच्या तीन वर्षांपासून चेतेश्वर पुजाराची अवस्था वाईट आहे. 2020 पासून त्याला फक्त एकच शतक झळकावता आलंय. गेल्या 28 कसोटी सामन्यात त्याची सरासरी 30 पेक्षा कमी आहे. 45 ते 50 दरम्यान असणारी त्याची सरासरी आता 43.60 वर घसरली आहे. आणि याच कारणामुळे त्याचा बळी दिला जातोय.
जर आकडेवारीवर नजर टाकली तर विराट कोहली आणि पुजाराच्या गेल्या तीन वर्षांतील कसोटीच्या सरासरीत फारसा फरक नाहीये. मागच्या तीन वर्षात सर्वाधिक धावा रोहित शर्माने काढल्या आहेत. 18 कसोटी सामन्यांमध्ये 43.20 च्या सरासरीने 1296 धावा केल्या आहेत ज्यात तीन शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. के एल राहुलने 11 सामन्यात 30.28 च्या सरासरीने 636 धावा केल्या आहेत ज्यात दोन शतकांचा समावेश आहे.
शुभमन गिलने 16 कसोटी सामन्यांमध्ये 32 च्या सरासरीने 2 शतकांसह 921 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने 25 कसोटी सामन्यांमध्ये 29.69 च्या सरासरीने 1 शतक आणि 6 अर्धशतकांसह 1277 धावा काढल्या आहेत. हेच चेतेश्वरने 28 सामन्यांत 29.69 च्या सरासरीने 1455 धावा केल्या आहेत. यादरम्यान एक शतक आणि 11 अर्धशतकं झळकावली आहेत.
पुजाराचं भविष्य काय?
चेतेश्वर पुजाराची आता वाईट वेळ सुरू झाली आहे. यापूर्वी 2022 मध्ये त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतरही कसोटी संघातून वगळण्यात आलं. मात्र काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे भारतीय संघात त्याचं पुनरागमन झालं. यावेळी त्याची काउंटीमधील कामगिरी चांगली होती. पण काउंटीमध्ये सरासरी गोलंदाज खेळत असल्याचं अनेक तज्ञांचं म्हणणं आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी पुजाराच्या जागी यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या दोन युवा फलंदाजांना संघात स्थान देण्याचा निर्णय घेतलाय.
या दोन्ही खेळाडूंनी आयपीएलमध्येही लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. यशस्वी हा डावखुरा फलंदाज आहे, त्यामुळे भविष्यातली टीम तयार केली जात असल्याचं बोललं जातंय. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना 12 जुलैला पार पडणार आहे.
चेतेश्वर पुजारा अवघ्या 35 वर्षांचा आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या मते, इतर खेळाडूंप्रमाणे त्याचे लाखो फॉलोअर्स नाहीयेत जे त्याच्या बाजूने ओरडतील. त्यामुळे फिरून मुद्दा येतो प्रतिमेवर येतो. याची आपण सुरुवातीला चर्चा केली होती. शॉर्ट लेग आणि नंबर 3 वर खेळणाऱ्या उत्कृष्ट खेळाडूची इनिंग थोडी लवकर संपत असल्याचं चित्र आहे.