विराट कोहली नाबाद 87 आणि रवींद्र जडेजा 36 धावांवर खेळत होते. म्हणजेच कोहली त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 76 व्या शतकापासून केवळ 13 धावा दूर आहे. 34 वर्षीय कोहलीने 161 चेंडूंच्या खेळीत आठ चौकार मारले आहेत. त्याचवेळी रवींद्र जडेजाने आतापर्यंत 84 चेंडूंचा सामना केला असून त्याच्या बॅटमधून चार चौकार आले आहेत. जडेजा आणि कोहली यांनी आतापर्यंत पाचव्या विकेटसाठी 201 चेंडूत 106 धावांची भागीदारी केली आहे.
विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे, जो त्याने शानदार खेळी खेळून संस्मरणीय बनवला आहे. कोहली आपल्या 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. या शानदार खेळीदरम्यान, कोहली सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याच्या बाबतीत जॅक कॅलिसला मागे टाकत पाचव्या क्रमांकावर आला. या डावात विराटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 2000 धावाही पूर्ण केल्या. विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय स्तरावार सर्वाधिक धावा (25,548) करणारा 5 वा फलंदाज ठरला आहे. तसेच विराट कोहली WTC मध्ये 2000 धावांचा टप्पा पार करणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला.