विराटला माझी पद्धत पसंत नव्हती : अनिल कुंबळे

गुरूवार, 22 जून 2017 (11:34 IST)
कर्णधार म्हणून विराट कोहलीला माझ्या प्रशिक्षणाची पद्धत आवडली नव्हती आणि म्हणूनच मी तातडीने राजीनामा दिला, असे स्पष्टीकरण अनिल कुंबळे यांनी दिले आहे. दिग्गज फिरकीपटू आणि माजी कर्णधार असलेल्या कुंबळे यांनी मंगळवारी संध्याकाळी टीम इंडियाचे प्रशिक्षकपद सोडल्यानंतर भारतच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडाली. विराटशी असलेले मतभेद हेच कारण यामागे होते, हे कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर स्पष्ट झाले आहे. माझी आणि विराटची भागीदारी न टिकणारी होती, असेही त्यांनी म्हटले आहे. 
 
माझ्या प्रशिक्षणाच्या पद्धती कर्णधाराला पसंत नसल्याचे मला सोमवारी संध्याकाळी प्रथमच कळाले आणि त्यामुळे मला धक्‍का बसला व मी पद सोडण्याचा निर्णय घेतला, असे ‘जम्बो’ या टोपण नावाने ओळखल्या जाणार्‍या  कुंबळे यांनी ट्विटरवरून शेअर केलेल्या  पत्रात म्हटले आहे. प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यातील सीमारेषेचा मी नेहमीच आदर केला. संघाचे हित लक्षात घेऊन खेळाडूंना वैयक्‍तिक चुका दाखवणे हे प्रशिक्षकाचे कामच आहे. ते मी अतिशय प्रामाणिकपणे केले. कर्णधार आणि माझ्यातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न बीसीसीआयने केला खरा; मी कर्णधाराशी असलेली माझी भागीदारीच अस्थिर झाली होती. मात्र माझ्यासमवेत काम करण्याबाबत कर्णधाराचा आक्षेप लक्षात आल्यावर मी पदावरून दूर होणेच पसंत केले, असे कुंबळे यांनी म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा