टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात 'हे' नवे चेहरे, अशी असेल टीम

सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (22:25 IST)
पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. निवड समितीची मुंबईत बैठक झाली. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि अष्टपैलू दीपक हुड्डा या संघातले नवे चेहरे आहेत.
 
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाला 5 जेतेपदं मिळवून देण्याची किमया करणाऱ्या कर्णधार रोहित शर्माकडे ट्वेन्टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची धुरा असणार आहे.
 
ट्वेन्टी20 प्रकारात बॅट्समन म्हणूनही रोहितची हुकूमत आहे. या प्रकारात रोहितच्या नावावर 4 शतकं आहेत.
 
दुखापतीतून सावरलेला के.एल. राहुल संघासाठी महत्त्वाचा आहे. राहुलला आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पण अफगाणिस्तानविरुद्ध अर्धशतकी खेळी करत राहुलने सूर गवसल्याचे संकेत दिले.
 
वेस्ट इंडिज तसंच आयर्लंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आलेल्या विराट कोहलीने आशिया चषक स्पर्धेद्वारे दमदार पुनरागमन केलं. तब्बल तीन वर्षांचा शतकाचा दुष्काळ कोहलीने संपवला. अफगाणिस्तानविरुद्ध कोहलीने 122 धावांची दमदार खेळी केली. ट्वेन्टी20 प्रकारात कोहलीची आकडेवारी अचंबित करणारी आहे.
 
गेल्या दोन वर्षात छाप उमटवणाऱ्या सूर्यकुमार यादवकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. ऋषभ पंत विकेटकीपिंग आणि बॅटिंगसाठी संघात आहे.
 
अष्टपैलू हार्दिक पंड्या भन्नाट फॉर्मात आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करत असल्याने संघाला अतिरिक्त फलंदाज किंवा अतिरिक्त गोलंदाज खेळवता येतो.
 
रवींद्र जडेजाला दुखापतीमुळे संधी नाही
दुखापतीमुळे रवींद्र जडेजा वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. गुडघ्याच्या दुखापतीमुळे जडेजाने आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली. त्याच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाली असून, लवकरच तो रिहॅबची प्रक्रिया सुरू करणार आहे.
 
अनुभवी रवीचंद्रन अश्विनला संघात स्थान मिळालं आहे. जडेजाच्या अनुपस्थितीत अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल या दोघांवर फिरकी आक्रमणाची जबाबदारी आहे. अश्विन आणि अक्षर चांगली फलंदाजी करत असल्याने संघाला संतुलन प्राप्त झालं आहे.
 
गेल्या सहा महिन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या दीपक हुड्डाला पहिल्यांदाच वर्ल्ड कप संघात संधी मिळाली आहे. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध झेल सुटल्यामुळे ट्रोलिंगची शिकार झालेला अर्शदीप सिंग पहिल्यांदाच वर्ल्ड कप संघात असणार आहे.
 
दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेत खेळू न शकलेले जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलचं संघात पुनरागमन झालं आहे. डावाच्या सुरुवातीला आणि हाणामारीच्या षटकांमध्ये बुमराह भारतीय संघासाठी महत्त्वाचा आहे. घोटीव यॉर्कर, स्लोअरवन चेंडूसह हर्षल पटेलने धावा रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे हाताळल्या आहेत.
 
अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेत उत्तम फॉर्मात असल्याचं सिद्ध केलं आहे.
 
फिनिशर म्हणून दिनेश कार्तिकने छाप उमटवली आहे. कार्तिकच्या समावेशामुळे संघाला विकेटकीपिंगचा अतिरिक्त पर्याय मिळतो.
 
फिट असूनही मोहम्मद शमीच्या नावाचा आशियाई चषक स्पर्धेसाठी विचार करण्यात आला नव्हता. वर्ल्ड कपसाठी राखीव म्हणून मोहम्मद शमी, फलंदाज श्रेयस अय्यर यांच्यासह फिरकीपटू रवी बिश्नोई आणि अष्टपैलू दीपक चहर राखीव खेळाडू असतील.
 
गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड कप संघातून इशान किशन, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती, शार्दूल ठाकूर यांना डच्चू देण्यात आला आहे.
 
रविवारी आटोपलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळला होता. पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही संघांनी भारताला नमवलं होतं. अफगाणिस्तानविरुद्ध भारताने दणदणीत विजय मिळवला.
 
2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्यावहिल्या जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर मात्र भारतीय संघाला जेतेपदाने हुलकावणी दिली आहे.
 
2009 मध्ये पाकिस्तानने तर 2010 मध्ये इंग्लंडने जेतेपदाची कमाई केली. वेस्ट इंडिजने 2012 मध्ये जेतेपदावर कब्जा केला. 2014 मध्ये श्रीलंकेचा संघ अजिंक्य ठरला होता.
 
2016 मध्ये भारताकडे स्पर्धेचं यजमानपद होतं. पण वेस्ट इंडिजने जेतेपदावर मोहोर उमटवली. गेल्या वर्षी दुबईत झालेल्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच जेतेपद पटकावण्याची किमया केली.
 
भारतीय संघ-
रोहित शर्मा,के.एल.राहुल,विराट कोहली,सूर्यकुमार यादव,हार्दिक पंड्या,ऋषभ पंत,दिनेश कार्तिक,अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह,हर्षल पटेल,भुवनेश्वर कुमार,दीपक हुड्डा,रवीचंद्रन अश्विन,युझवेंद्र चहल,अर्शदीप सिंग,
 
राखीव- मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती