शामीमुळेच सामना जिंकलो

शुक्रवार, 31 जानेवारी 2020 (12:34 IST)
अत्यंत रोमहर्षक आणि अटीतटीच्या झालेल्या भारतविरुद्ध न्यूझीलंड तिसर्‍या टी-20 सामन्यात सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकत भारताला विजय मिळवून देणार्‍या रोहित शर्माने विजयाचे श्रेय जलदगती गोलंदाज मोहम्मद शामीला दिले.
 
भारताचा विजय शामीनेच निश्चित केला होता. शामीने टाकलेल्या अखेरच्या षटकामुळे सामनचे चित्र पलटले. त्यामुळेच सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि अखेर भारत जिंकला, असे रोहित म्हणाला.
 
ज्याप्रकारे ते फलंदाजी करत होते. त्यावरून हा सामना सुपर ओव्हरमध्ये जाईल, असे आम्हाला वाटलेच नव्हते. एकवेळ तर ते सहज सामना खिशात घालतील असे वाटत होते. पण शामीचे अखेरचे षटक निर्णायक ठरले. खरे म्हणजे माझ्या दोन षटकारांमुळे नाही तर शामीच्या त्या षटकामुळेच आम्ही सामना जिंकलो ती ओव्हर टाकण्यासाठी आणि सामना भारताच्या बाजूने झुकवण्यासाठी शामीला सलाम, अशा शब्दात रोहित शर्माने शामीचे कौतुक केले.
 
सामन्याच्या अखेरच्या षटकात न्यूझीलंडला 9 धावांची आवश्कता होती. पहिल्याच चेंडूंवर रॉस टेलरने उत्तुंग षटकार लगावला, त्यानंतर न्यूझीलंडचा विजय निश्चित मानला जात होता. पण त्यानंतर शमीने अनपेक्षितपणे शानदार कमबॅक केले. दुसर्‍या चेंडूवर एक धाव दिली. तिसर्‍या चेंडूवर न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनला यष्टीरक्षक राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याच्याजागी आलेल्या टीम सेइफर्टला पुढचा चेंडू निर्धाव टाकला. आता दोन चेंडूंमध्ये दोन धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर शमीने टीम सेइफर्टला पुन्हा चकवले, पण एक धाव घेण्यात तो यशस्वी ठरला. आता दोन्ही संघाची धावसंख्या समान झाली होती. अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडला विजयासाठी एका धावेची आवश्कता असताना शमीने रॉस टेलचा त्रिफळा उडवला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यानंतर भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले, असेही रोहित शर्मा म्हणाला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती