भारतीय T20 देशांतर्गत स्पर्धेतील सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचे सामने बुधवारी खेळवले जाणार आहेत. बंगालचा सामना बडोद्याशी होणार असून यामध्ये सर्वांच्या नजरा भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर असतील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये शमी खेळू शकतो, असे मानले जात आहे आणि त्यासाठी एनसीए वैद्यकीय संघाचे सदस्य त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत.
घोट्याच्या शस्त्रक्रियेतून सावरल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारा भारतीय वेगवान गोलंदाज शमी बुधवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळताना त्याच्या तंदुरुस्तीची चिंता कमी करण्याचा प्रयत्न करेल. शमीच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर बंगालने सोमवारी चंदीगडवर तीन धावांनी रोमहर्षक विजय मिळवत अंतिम आठमध्ये आपले स्थान निश्चित केले.
दुखापतीतून परतल्यानंतर शमीने एक रणजी आणि आठ टी-२० सामने खेळले आहेत. या काळात त्याने गोलंदाजीत 64 षटकात 16 बळी घेतले आहेत. या मोसमात बडोदा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात सिक्कीमविरुद्ध पाच गडी गमावून 349 धावा केल्या होत्या. टी-20 क्रिकेटमधला हा नवा विक्रम आहे. या सामन्यात संघाने 37 षटकार मारण्याचा विक्रमही केला.