भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे.मंधानाने शनिवारी डंबुलामध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 39 धावांची शानदार खेळी केली.आपल्या खेळीदरम्यान तिने 34 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये तिने 8 चौकार मारले.त्याचबरोबर हरमनप्रीतने भारताची माजी महिला कर्णधार मिताली राजचा विक्रम मोडला आहे.
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारी मंधाना ही पाचवी भारतीय फलंदाज (पुरुष आणि महिला) ठरली आहे.मंधानापूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा, मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत.मंधानाही आता या यादीत सामील झाली आहे.
या मालिकेत हरमनप्रीतने इतिहास रचला आहे.तिने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिताली राजचा विक्रम मोडला आहे.हरमनप्रीत आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे.मितालीने 2019 मध्ये या शॉर्ट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती.हरमप्रीतच्या आता 123 सामन्यात 2372 धावा आहेत तर मितालीच्या 2364 धावा आहेत.
भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी डंबुला येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 रोमांचक सामन्यात श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव केला.या विजयासह भारतीय महिला संघाने तीन सामन्यांची मालिका जिंकली आहे.भारताने या मालिकेतील पहिला सामना 34 धावांनी जिंकला होता तर तिसरा आणि अंतिम सामना 27 जून रोजी याच स्टेडियमवर खेळवला जाईल.दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 20 षटकांत 7 बाद 125 धावांवर रोखले आणि त्यानंतर 19.1 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.