सचिन तेंडुलकर पुन्हा धरणार हातत बॅट

शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (13:41 IST)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बॅटिंग पाहण्याची सुवर्ण संधी चाहत्यांना पुन्हा मिळणार आहे. सचिनने 2013 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली पण आता पुन्हा एकदा मुंबईत सचिनला बॅटिंग करताना पाहण्याची संधी मिळणार आहे.
 
तसं तर गेल्या रविवारी ऑस्ट्रेलियात झालेल्या बुश फायर रिलीफ फंड सामन्यात सचिनने साडेपाच वर्षानंतर बॅट हातात घेतली. सचिनने एक ओव्हर खेळली होती. सचिनच्या या खेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. 
 
आता सचिनच्या भारतातील चाहत्यांना मुंबईत त्याची बॅटिंग पाहता येणार आहे. 7 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजता अनअकॅडेमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा पहिला सामना सचिन तेंडुलकरच्या विरुद्ध ब्रायन लारा यांच्यात होणार आहे.
 
अनअकॅडेमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज ही टी-20 स्पर्धा पाच देशांमध्ये खेळवली जात आहे. यात भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या देशातील दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत. 
 
या स्पर्धेत विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, ब्रायन लारा, शिवनारायण चंद्रपॉल, ब्रेट ली, ब्रॅड हॉज, जॉन्टी ऱ्होड्स, हाशिम आमला, मुथय्या मुरलीधरन, तिलकरत्ने दिलशान, अजंता मेंडिस हे खेळाडू देखील असणार आहेत.
 
स्पर्धेतील 11 पैकी दोन सामने वानखेडे स्टेडियमवर, चार पुण्यातील एमसीए स्टेडियमवर, चार नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर आणि अंतिम सामना 22 मार्च रोजी ब्रेबोन स्टेडियमवर होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती