नेपाळच्या काठमांडू जिल्हा न्यायालयाने बुधवारी बलात्कार प्रकरणी मोठा निकाल देत माजी कर्णधार आणि अनुभवी फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने याला 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. संदीपवर एका 17 वर्षीय तरुणीने हॉटेलच्या खोलीत बलात्कार केल्याचा आरोप आहे. मात्र कोर्टाच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या वेळी मुलगी अल्पवयीन नव्हती.
न्यायमूर्ती शिशिरराज ढकल यांच्या एकल खंडपीठाने आज सुनावणी केल्यानंतर नुकसान भरपाई आणि दंडासह 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मुलीने 6 सप्टेंबर रोजी महानगर पोलीस सर्कल, गोशाळेत 22 वर्षीय क्रिकेटपटूविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी लामिछाने कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) खेळत होते. नेपाळ पोलिसांनी त्याला 6 ऑक्टोबर रोजी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. आरोपपत्राद्वारे जिल्हा वकिलांनी पीडितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी लामिछाने यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर लामिछाने यांचे बँक खाते आणि मालमत्ता जप्त करण्यात आली.