एव्हरेस्टवर गिर्यारोहकांमुळे ट्रॅफिक जॅम!

यंदा जगातील सर्वोच्च उंचीचे शिखर एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी नेपाळमध्ये जमलेल्या गिर्यारोहकांची संख्या पाहता एव्हरेस्टवर ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेपाळच्या पर्यटन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एव्हरेस्ट चढाईसाठी यंदा 400 गिर्यारोहकांनी नोंदणी केली आहे. त्यांच्याबरोबर मदतीसाठी जाणार्‍या शेर्पांची संख्या 1 हजारापर्यंत असेल. अनेक गिर्यारोहक टीम बेस कँपवर दाखल झाल्या आहेत. हवामान स्वच्छ असेल तर चढाईची घाई सर्वच गिर्यारोहकांना असते व त्यामुळे येथे ट्रॅफिक जॅम होण्याची भीती आहे.
 
पर्यटक विभागाचे माहिती अधिकारी दुर्गादत्त धाकला म्हणाले, समिटसाठी जाणार्‍या गिर्यारोहकांसाठी नंबर लावण्याची सुविधा नसते. कारण कुणाला कोणती अडचण येईल हे सांगता येत नाही व त्यामुळे जो पुढे जाईल त्यांना नंबर लावून सोडणे अशक्य  असते. त्यातच माघारी वळणारे गिर्यारोहकही असतात.
 
त्यांच्याकडे ऑक्सिजन कमी असतोच शिवाय ते थकलेलेही असतात. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. 2015 मध्ये संमत केल्या गेलेल्या नव्या कायद्यानुसार एव्हरेस्ट चढाई नोंदणीची मुदत तीन वर्षे होती यंदा त्याचे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे पूर्वी परवानगी मिळालेले गिर्यारोहक ही संधी दवडणार नाहीत. आत्ताच नामचेपासून बेस कँपपर्यंत 237 गिर्यारोहक गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा