KKR vs RCB: विराट कोहली आणि फिल साल्ट यांच्यातील 95 धावांच्या मजबूत भागीदारीमुळे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवून एक उत्तम सुरुवात केली आहे. आयपीएलच्या 18 व्या हंगामातील पहिला सामना शनिवारी ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, गतविजेत्या संघाने अजिंक्य रहाणे आणि सुनील नारायण यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर 20 षटकांत आठ गडी गमावून 174 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीने 16.2 षटकांत तीन गडी गमावून 177 धावा केल्या आणि सामना सात गडी राखून जिंकला.
कोलकात्याची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात जोश हेझलवूडने क्विंटन डी कॉकची विकेट घेतली. त्याला फक्त चार धावा करता आल्या. यानंतर, सुनील नारायण आणि अजिंक्य रहाणे यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 55चेंडूत 103 धावांची तुफानी भागीदारी झाली. कर्णधार रहाणेने फक्त 25 चेंडूत त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 31 वे अर्धशतक झळकावले. तो 31 चेंडूत 56 धावा काढून बाद झाला तर वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटपटू नरेनने पाच चौकार आणि तीन षटकारांसह 44 धावा केल्या
त्यानंतर, केकेआरचा डाव डळमळीत झाला आणि त्यांनी एकामागून एक विकेट गमावल्या. अंगकृष रघुवंशीने 30, वेंकटेश अय्यरने सहा, आंद्रे रसेलने चार, हर्षित राणाने पाच धावा केल्या. दरम्यान, रमनदीप सिंग सहा धावांवर आणि स्पेन्सर जॉन्सन एका धावेवर नाबाद राहिले. आरसीबीकडून कृणाल पंड्याने तीन तर जोश हेझलवूडने दोन विकेट घेतल्या. याशिवाय यश दयाल, रसिक सलाम आणि सुयश शर्मा यांना प्रत्येकी एक यश मिळाले.