भारत-इंग्लंड सामन्यादरम्यान मैदानात घुसखोरी करणाऱ्या 'जार्वो'ला अटक

शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (13:07 IST)
भारत आणि इंग्लंडदरम्यान ओव्हलमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एका व्यक्तीला स्टेडियममध्ये घुसून खेळाडूवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
 
या व्यक्तीनं इंग्लंडचा क्रिकेटपटू जॉनी बेअरस्टोला धक्का दिला होता. जार्वो नावाचा हा व्यक्ती सकाळीच सामन्यादरम्यान मैदानात घुसला होता.
 
भारतीय गोलंदाज उमेश यादवची नक्कल करत त्यानं जॉनी बेअरस्टोला धक्का दिला होता. जार्वोला आता अटक करण्यात आली आहे. यापूर्वीच्या दोन कसोटींतही जार्वोनं असं कृत्य केलं होतं.
 
''पिचवर कुणीही शिरलेलं मान्य केलं जाणार नाही. जिथं खेळाडुंच्या सुरक्षितचेचा प्रश्न असेल तिथं कधीही तडजोड केली जाणार नाही, '' असं इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं म्हटलं आहे. जार्वो सध्या दक्षिण लंदनच्या एका पोलिस ठाण्यात पोलिसांच्या ताब्यात आहे.
 
हा प्रकार इंग्लंडच्या डावादरम्यान 34 व्या ओव्हरमध्ये झाला होता. भारताचा उमेश यादव गोलंदाजी करत असताना जार्वो पिचकडे धावत आला होता.
 
या प्रकारामुळं सामना पाच मिनिटं थांबला होता.
 
जार्वोनं सामन्यादरम्यान मैदानावर घुसण्याची ही तिसरी वेळ आहे.
 
लॉर्ड्स कसोटीतही घुसला होता मैदानात
जार्वो मैदानात घुसण्याची या मालिकेतली ही तिसरी वेळ आहे. आधी लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही जार्वो मैदानात घुसला होता.
 
लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी लंचनंतर जार्वो भारतीय टीमसह मैदानात घुसला आणि ज्या पद्धतीनं कर्णधार फिल्डींग सेट करत असतो तसे इशारे करू लागला होता.
 
"पांढरे कपडे परिधान केलेला एक व्यक्ती भारतीय क्रिकेटपटुंसह मैदानात घुसला आहे. तो कसोटी खेळायला आला असावा, असं त्याच्या हाव-भावांवरून वाटत आहे," असं कॉमेंट्री करणारे इंग्लंडचे माजी कर्णधार माइक अथर्टन म्हणाले होते.
 
जार्वोचं पूर्ण नाव डॅनियल जार्विस आहे. लॉर्ड्सच्या घटनेंनंतर त्यानं एक ट्वीट केलं होतं. त्यात त्यानं भारताकडून खेळणारा तो पहिला गोरा व्यक्ती असल्याचं म्हटलं होतं. ट्विटर बायोमध्ये जार्वोनं तो कॉमेडियन, फिल्ममेकर आणि प्रँक्सटर असल्याचं म्हटलं आहे.
 
सुरक्षेला धोका
सोशल मीडियावर अनेक लोक यावर चिमटे काढत आहे. पण काही लोकांनी हे अत्यंत धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.
 
"जर कोविडच्या काळात तिसऱ्यांदा भारतात अशी घटना घडली असती, तर इंग्लंडच्या मीडिया आणि माजी क्रिकेटपटुंनी गांगुली यांना पदावरून हटवण्याची मागणी केली असती, असं @CSKian नावाच्या ट्विटर हँडलवर मान्या यांनी म्हटलं आहे.
 
त्याशिवाय अनेक भारतीय यूझर्स सोशल मीडियावर या प्रकरणी टीका करत आहेत. एखाद्या व्यक्तीला वारंवार मैदानावर कसं येऊ दिलं जाऊ शकतं, असं अनेकांचं म्हणणं आहे.
 
अशी घटना भारतात घडली असती, तर आंतरराष्ट्रीय मीडियानं काय भूमिका घेतली असती? असंही काही लोक विचारत आहेत.
 
"माझ्या मते या प्रकरणी इंग्लंडच्या मैदानांवर काम करणाऱ्यांपैकी काही जणांची नोकरी जायला हवी. सुरक्षेतील अत्यंत गंभीर अशी ही चूक आहे आणि ते वारंवार घडत आहे. आता ही गंमत राहिलेली नाही," असं प्रसिद्ध भारतीय कॉमेंटेटर हर्षा भोगले म्हणाले.
 
आता हा गमतीचा भाग राहिलेला नाही. अशा प्रकारच्या कमकुवत सुरक्षा व्यवस्थेचा फायदा कुणीही उचलू शकतो. अशा व्यक्तीचं फार कौतुक करता कामा नये. कारण तो व्यक्ती इतरांनाही प्रोत्साहीत करू शकतो, असं निशाद ट्विटरवर म्हणाले.
दरम्यान, सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात बिनबाद 43 धावा केल्या आहे. भारत अजूनही इंग्लंडपेक्षा 56 धावांनी पिछाडीवर आहे.
 
इंग्लंडचा पहिला डाव 290 धावांवर संपुष्टात आला. त्यात इंग्लंडनं भारताविरोधात 99 धावांची आघाडी घेतली आहे. उमेश यादवनं 3 तर बुमराह आणि जडेजानं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
 
या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. लॉर्ड्समध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारतानं तर लीड्समधील तिसऱ्या कसोटीत इंग्लंडनं विजय मिळवला. त्यामुळं मालिका सध्या एक-एकनं बरोबरीत आहे. अखेरचा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये दहा सप्टेंबरपासून होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती