IndvsPak: भारतीय संघाच्या पाकिस्तानविरुद्ध मानहानीकारक पराभवाची 5 कारणं

सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (08:12 IST)
पाकिस्तानने शानदार कामगिरीच्या बळावर ट्वेन्टी20 विश्वचषकात भारताला नमवण्याची किमया केली. कोणत्याही स्वरुपाच्या विश्वचषकात भारताला नमवण्याची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ आहे.
 
ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये दहा विकेट्सनी जिंकण्याची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ आहे. भारताने आतापर्यंत विश्वचषकात पाकिस्तानवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं मात्र या सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर शरणागतीच पत्करली. काय आहेत भारताच्या पराभवाची कारणं?
 
दव आलं आणि सामना निसटला
युएईत या काळात रात्र सरू लागते तसं दव पडतं. दिवसा तापमान उष्ण असतं. हवेत आर्द्रता असते मात्र रात्री तापमान कमी होतं आणि दवही पडतं. दव पडू लागल्यानंतर चेंडू पकडायला त्रास होतो. चेंडू ग्रिप होत असल्याने गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करू शकत नाहीत. फलंदाजांना फटके खेळण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते.

दवामुळे भारतीय खेळाडू पिवळ्या रंगाचे टॉवेल घेऊन चेंडू कोरडा करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मोहम्मद रिझवान-बाबर आझम जोडीने या परिस्थितीचा आणि स्वैर गोलंदाजीचा फायदा उठवत पाकिस्तानला थरारक विजय मिळवून दिला. काही दिवसांपूर्वी संपलेल्या आयपीएल स्पर्धेतही दवाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवामुळे पराभवाला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.
 
थकवा
भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना झाला. ती फायनल झाल्यानंतर इंग्लंडविरुद्ध चार कसोटी झाल्या. त्यानंतर भारतीय खेळाडू मायदेशी न परतता युएईला रवाना झाले. कोरोना प्रादुर्भावामुळे अर्धवट राहिलेला आयपीएलचा उत्तरार्ध पार पडला. त्यानंतर काही तासाच विश्वचषकाला सुरुवात झाली.
भारतीय संघ 365 पैकी 300 दिवस तरी खेळत असतो. सततच्या खेळण्यामुळे शरीरावर परिणाम होतो. भारतीय खेळाडू विश्वचषकाच्या पहिल्या लढतीत चैतन्यरहित वाटले. त्यांच्या देहबोलीत उत्साह नव्हता. विश्वचषक जिंकायचा असेल तर भारतीय संघाला या पराभवातून बोध घेत पुनरागमन करावं लागेल.
 
पाकिस्तानच्या ताकदीची कल्पना नाही
भारत-पाक संबंध दुरावल्यामुळे पाकिस्तानचा संघ भारतात येत नाही. भारतीय संघ पाकिस्तानात जात नाही. पाकिस्तानचे खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळत नाहीत. भारतीय खेळाडू पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळत नाहीत. पाकिस्तानचे खेळाडू कसे खेळतात, कसं आक्रमण करतात, कसं पुनरागमन करतात, त्यांची शैली काय हे समजून घेण्यासाठी भारतीय खेळाडूंना फक्त युट्यूबचा पर्याय आहे.
 
शाहीन शाह आफ्रिदी गेले 3 वर्षात तिन्ही प्रकारात दर्जेदार कामगिरी करतो आहे. मोहम्मद रिझवान-बाबर आझम ही जोडी ट्वेन्टी20 प्रकारात धावांची टांकसाळ उघडून धुमाकूळ घालते आहे. बाबरची तुलना विराट कोहलीशी केली जाते आहे. पाकिस्तानकडे चांगल्या खेळाडूंची वानवा कधीच नसते. त्यांच्या खेळात सातत्याचा अभाव असतो. पण पाकिस्तानची ताकद हे समजून घेण्यात भारतीय संघ कमी पडला असं दिसलं.
पाकिस्तानने विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज सलामीवीर मॅथ्यू हेडन आणि दक्षिण आफ्रिकेचा चतुर गोलंदाज व्हरनॉन फिलँडरला कोचिंग स्टाफमध्ये समाविष्ट केलं. त्वेषाने आक्रमण करण्यासाठी हेडन प्रसिद्ध होता. पाकिस्तानच्या खेळात रविवारी तोच दृष्टिकोन दिसून आला. प्रतिस्पर्ध्यांचे कच्चे दुवे हेरून शिस्तबद्ध गोलंदाजीसाठी फिलँडर प्रसिद्ध आहे. पाकिस्तानच्या खेळात हे दिसून आलं.
 
फाजील आत्मविश्वास
भारतीय संघाची विश्वचषकातली पाकिस्तानविरुद्धची कामगिरी दैदिप्यमान होती. विश्वचषक, भारत-पाकिस्तान सामना म्हणजे जिंकणं हे समीकरण पक्कं असायचं. 50 षटकांचा विश्वचषक असो की ट्वेन्टी20 भारतीय संघ जिंकतच आला आहे. भारतीय संघाच्या खेळात आत्मविश्वासाची पातळी अधिकच झाल्याचं दिसून आलं.
सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत यांनी चांगली सुरुवात केली मात्र मोक्याच्या क्षणी त्यांनी विकेट गमावल्या. हार्दिक पंड्या पूर्ण फिट नसतानाही खेळतोय हे दिसून आलं. पाठीच्या दुखण्यामुळे तो गोलंदाजी करत नाही. मात्र फलंदाजी करताना तो शंभर टक्के फिट नाही हे स्पष्ट झालं. हार्दिकऐवजी पूर्ण फिट खेळाडूची निवड करता आली असती.
 
पाकिस्तासमोर 152 धावांचं लक्ष्य होतं. गोलंदाजांना बचाव करण्यासाठी पुरेशा धावा होत्या. मात्र एकाही गोलंदाजाला धावा रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्ही आघाड्यांवर लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. बाबर-रिझवान जोडीला रोखण्यासाठी भारतीय संघाकडे योजनाच नसल्याचं स्पष्ट झालं.
 
युएई घरचं मैदान
मायदेशातील अस्थिर परिस्थितीमुळे पाकिस्तान संघाचे सामने युएईत होतात. युएई हे त्यांचं होम ग्राऊंड आहे. त्यामुळे दुबई असेल किंवा अबूधाबी इथे खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव पाकिस्तानच्या खेळाडूंकडे आहे. पाकिस्तानसाठी विश्वचषकाचे सामने एकप्रकारे घरच्या मैदानावर खेळल्यासारखं आहे.
 
या मैदानांची, आकाराची, भौगोलिक परिस्थितीची त्यांना सखोल कल्पना आहे. इथे खेळणं हा त्यांच्यासाठी नवीन अनुभव नाही. युएईत किती गरम होतं, त्यासाठी ऊर्जा कशी वाचवायची, दवाचा मुद्दा निपटण्यासाठी काय करायचं यावर त्यांनी आधीच काम केलं आहे. भारतीय खेळाडू आयपीएलच्या निमित्ताने तिथे खेळत असले तरी पाकिस्तानएवढा अनुभव त्यांच्याकडे नाही.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती