India vs New Zealand: भारताचा आज पराभव झाला तर काय होईल?

रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (14:40 IST)
टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध न्यूझीलंडचे संघ आमने सामने असतील. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
 
पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून मोठ्या परभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळं आगामी सामन्यांमध्ये भारतीय संघ यापूर्वीच्या सामन्यात केलेल्या चुका दुरुस्त करणार असल्याचं भारताचा कर्णधार विराट कोहलीनं म्हटलं.
 
पाकिस्तानच्या विरोधातील सामन्यात नेमकी काय चूक झाली याची संघाला जाणीव आहे,असं रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना कोहलीनं म्हटलं.
दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाला 10 विकेटनं पराभव पत्करावा लागला होता. या विजयासह पाकिस्ताननं भारताला विश्वचषकात प्रथमच पराभूत करत इतिहास रचला होता.
 
भारतीय संघानं पाकिस्तानच्या संघाला कमकुवत समजलं नसल्याचंही विराट कोहलीनं म्हटलं आहे.
 
"तुम्ही कुणालाही कमकुवत समजू शकत नाही. विशेषतः पाकिस्तान सारख्या संघाला. कारण त्यांचा दिवस असेल तर ते कोणत्याही संघाला पराभूत करू शकतात. आम्ही खेळाचा आदर करतो. आमच्या विरोधात कोणताही संघ असेल तरी आम्ही त्या संघाला कमकुवत समजत नाही. आम्ही कधीही विरोधकांत भेदभाव करत नाही," असं कोहलीनं म्हटलं.
टी-20 विश्वचषकात भारतासाठी यापुढचे सामने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतासमोरचं पुढचं आव्हान न्यूझीलंड असणार आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताचं या सामन्यात जिंकणं अत्यंत गरजेचं आहे.
 
सध्याची स्थिती पाहता भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांसाठी 'करा किंवा मरा' अशी स्थिती असणार आहे.
 
उपांत्य फेरीचा मार्ग कुणाला सापडणार?
ग्रुपमधील या दोन्ही संघांना पाकिस्तान विरोधात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळं आता एकमेकांना पराभूत केल्याशिवाय त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करता येणार नाही.
 
ग्रुपमध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, भारत, नामिबिया, स्कॉटलँड आणि अफगाणिस्तान हे सहा संघ आहेत. पाकिस्ताननं या गटात भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्याबरोबर तीन सामने खेळले असून तिन्हीमध्ये विजय मिळवला आहे. पाकिस्ताननं या गटात अव्वल क्रमांक पटकावत, सेमीफायनलमध्ये जवळपास स्थान निश्चित केलं आहे.
ग्रुपमधील केवळ दोन संघ सेमीफायनलमध्ये जाणार आहे. अशा परिस्थितीत आता केवळ एकाच संघासाठी स्थान शिल्लक आहे. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ हे स्थान मिळवण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावतील.
 
भारत आणि न्यूजझीलंडचे अफगाणिस्तान, स्कॉटलँड आणि नामिबियाबरोबरही सामने होणार आहेत. पण आजचा सामना एवढा महत्त्वाचा का आहे? ते जाणून घेऊयात.
 
गुणांचा खेळ
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही अत्यंत मजबूत संघ आहेत. दोन्ही संघांनी कायम मोठ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. जर दोन्ही संघ अफगाणिस्तान, स्कॉटलँड आणि नामिबिया विरोधात जिंकले तर स्थिती कशी असेल.
 
अशा परिस्थितीत दोन्ही संघांचे 6-6 गुण असतील.
 
त्यामुळं जर आजच्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला पराभूत केलं तर त्यांचे आठ गुण होतील. तर न्यूझीलंड सहा गुणांवर असेल. तसं झाल्यास भारत आणि पाकिस्तान यांचं उपांत्य फेरीचं स्थान निश्चित होईल.
 
न्यूझीलंडनं या सामन्यात भारताचा पराभव केला तर न्यूझीलंडचे आठ गुण होतील आणि भारत 6 गुणांवर राहील. त्यामुळं न्यूझीलंडला उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल.
मात्र, ही स्थिती दोन्ही संघांनी अफगाणिस्तान, स्कॉटलँड आणि नामिबिया तिघांनाही पराभूत केलं, तरच निर्माण होईल. मात्र, क्रिकेटमध्ये काहीही निश्चित नसतं, त्यामुळं यात मोठे उलटफेरही होऊ शकतात.
 
अफगाणिस्ताननं पाकिस्तान विरोधातील सामन्यात टक्कर दिली. अखेरपर्यंत त्यांनी संघर्ष केला. त्यामुळं न्यूझीलंड आणि भारतासाठीही अफगाणिस्तानचा संघ आव्हान ठरू शकतो.
 
न्यूझीलंडचा पाकिस्तानविरोधातील पराभव भारतासाठी फायद्याचा ठरला आहे, असंही म्हटलं जात आहे. कारण न्यूझीलंडचा विजय झाला असता, तर त्यांचाही एक गुण झाला असता आणि भारत शून्यावरच राहिला असता.
 
पाकिस्तानकडून पराभवानंतर भारताला आता केवळ कामगिरीवर नव्हे तर कोण कुणाला हरवतंय यावरही लक्ष ठेवावं लागेल. कारण इतरांच्या कामगिरीवरही भारताचं भवितव्य अवलंबून असेल सुपर 12 पातळीवर दोन संघांचे गुण सारखे झाले तर उपांत्य फेरीत प्रवेशासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करवा लागेल. त्यात नेट रन रेटची महत्त्वाची भूमिका असेल.
 
भारतासमोरील आव्हानं
भारतासाठी हा सामना जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच आव्हानात्मकही आहे. भारताला पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळं संघाच्या मानसिकतेवर परिणाम झाला असेल.
 
पाकिस्ताननं भारताला 10 विकेटनं पराभूत केलं. न्यूझीलंडला मात्र, पाकिस्तानची विकेट घेता आली. भारताच्या धावा न्यूझीलंडच्या तुलनेत खूप चांगल्या होत्या.
 
इतिहास पाहता, विश्वचषकात भारताची कामगिरी न्यूझीलंडविरोधात फारशी चांगली राहिलेली नाही.
भारतानं यापूर्वी 2003 मध्ये वन डे विश्वचषकात न्यूझीलंड विरोधात सामना जिंकला होता. त्यानंतर 2007 आणि 2016 च्या टी20 विश्वचषकात न्यूझीलंडनं भारताला पराभूत केलं होतं.
 
2019 च्या वन डे विश्वचषकाच्या सेमी फायनल आणि 2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
 
या दबावातून बाहेर पडला तर भारतीय संघ न्यूझीलंडचा पराभव करू शकेल. त्यासाठी संघाला आत्मविश्वास वाढवावा लागेल. पाकिस्ताननं ज्याप्रकारे 12 पराभवांनंतर विजय मिळवला आहे, त्याचप्रमाणे भारतीय संघालाही विजयाची गाथा लिहावी लागेल.
 
सुरुवातीला विकेट वाचवण्याचा प्रयत्न
तज्ज्ञांच्या मते, भारतीय संघाला योग्य रणनिती आखून मैदानात उतरावं लागेल. त्यांना पॉवरप्लेमध्ये कमीत कमी विकेट गमावत जास्त धावा गोळा कराव्या लागतील.
 
भारताला सुरुवातीला विकेट वाचवाव्या लागतील. पाकिस्तान विरोधातील सामन्यात रोहीत शर्मा आणि केएल राहुल यांचं बाद होणं हा मोठा धक्का ठरला होता.
 
यापूर्वीच्या सामन्यात जखमी असूनही हार्दिक पांड्याच्या संघातील समावेशावरून प्रश्न उपस्थित झाले होते, तर शार्दुल ठाकूरची कामगिरी पाहता, त्याला प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट करण्याबाबतही चर्चा झाली होती. टीममध्ये हार्दीक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार ऐवजी ईशान किशन आणि शार्दुल ठाकूरला स्थान दिलं जाऊ शकतं.
 
न्यूझीलंड समोरची आव्हानं
न्यूझीलंडचा विचार करता त्यांना पाकिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात अवघ्या, 134 धावाच करता आल्या होत्या. न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला 30 पेक्षा जास्त धावा करता आल्या नव्हत्या. या सामन्यात भारतीय गोलंदाज त्यांच्यासमोर आव्हान निर्माण करू शकतात.
 
न्यूझीलंडचं लक्ष त्यांच्या बॅटिंग ऑर्डरकडे असेल. डेरिल मिशेल आणि मार्टिन गप्टिल यांना सलामीला आणि जेम्स नीशमला चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करता आलेली नाही. तर, न्यूझीलंडच्या संघाच्या अखेरच्या दबाव असलेल्या षटकांचा सामना करण्यासाठी मजबूत खेळाडुची कमतरता कायम राहिली आहे. त्यावरही संघाला विचार करावा लागेल.
एका पराभवानंतर पुन्हा विजयाच्या मार्गावर परतण्यासाठी भारतीय संघ संपूर्ण शक्ती पणाला लावू शकतो. त्यासाठी न्यूझीलंडला तयार राहावं लागेल.
 
दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होत असेलल्या या सामन्यांमध्ये टॉसही अत्यंत महत्त्वाचा असतो. या स्पर्धेच्या बहुतांश सामन्यात नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनाच विजय मिळवण्यात यश आलेलं दिसून आलं आहे. त्यामुळं सामना जिंकण्याधी टॉस जिंकणं गरजेचं असेल.
 
त्यामुळं भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ आज सेमिफायनलच्या दिशेनं पुढं जाण्यासाठी जोर लावताना दिसतील.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती