शुभमन गिलच्या शतकाच्या मदतीने भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा सहा विकेट्सने पराभव केला. मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत बांगलादेशला 49.4 षटकांत 228 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात, गिलच्या 129 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 101 धावांच्या खेळीमुळे भारताने 46.3 षटकांत चार गडी गमावून 231 धावा करून सामना जिंकला. अशाप्रकारे भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली.
लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि गिलने भारताला चांगली सुरुवात करून दिली, परंतु रोहित 41 धावा करून बाद झाला. यानंतर संघाने विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांच्या विकेट गमावल्या. कोहलीने 22 धावा, श्रेयसने 15आणि अक्षरने आठ धावा केल्या. यानंतर, केएल राहुलने गिलसोबत पाचव्या विकेटसाठी 87 धावांची नाबाद भागीदारी केली. केएल राहुलने 47 चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांसह 41 धावा काढल्या आणि नाबाद राहिला. बांगलादेशकडून रिशाद हुसेनने दोन, तर तस्किन अहमद आणि मुस्तफिजूर रहमानने प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताकडून मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. शमीने सामन्यात पाच विकेट्स घेतल्या, तर हर्षित राणाने तीन आणि फिरकीपटू अक्षर पटेलने दोन विकेट्स घेतल्या. या काळात शमीने एकदिवसीय सामन्यांमध्ये 200 बळी पूर्ण केले. भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले आहे. गिलने 125 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.