भारतीय संघाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव करत चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टिळक वर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने 20 षटकांत 6 बाद 219 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला निर्धारित षटकांत सात विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 208 धावाच करता आल्या आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यानसेनने शानदार फलंदाजी करत 17 चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या.
यानसेनने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावले, जे त्याच्या T20 कारकिर्दीतील पहिले अर्धशतक आहे. यानसेनने संघाला विजयापर्यंत नेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र अर्शदीपने अखेरच्या षटकात त्याला बाद करत दक्षिण आफ्रिकेची शेवटची आशा मोडीत काढली. दक्षिण आफ्रिकेसाठी हेनरिक क्लासेनने 22 चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. अर्शदीपने क्लासेनलाही आपला बळी बनवले. भारताकडून अर्शदीपने तीन, वरुण चक्रवर्तीने दोन आणि हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलला प्रत्येकी एक विकेट मिळाली.