IND vs NZ U19: अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताने न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव केला

बुधवार, 31 जानेवारी 2024 (10:12 IST)
अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होत होता. सुपर सिक्सचा हा सामना ब्लोमफॉन्टेन येथील मॅनगाँग ओव्हल येथे खेळला गेला. भारतीय संघाने आपले सर्व गटस्तरीय सामने जिंकले होते. त्याचबरोबर न्यूझीलंडने गटस्तरावर तीनपैकी दोन जिंकले होते. त्यांना पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाने विजयाची घोडदौड कायम ठेवली आहे. त्यांनी न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव केला.
 
भारताने आपल्या सुपर सिक्स गट-1 सामन्यात न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव केला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत आठ गडी गमावून 295 धावा केल्या. मुशीर खानने 131 धावांची खेळी केली होती. तर, आदर्श सिंगने 52 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात किवी संघ 28.1 षटकांत 81 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून कर्णधार ऑस्कर जॅक्सनने (19) सर्वाधिक धावा केल्या. भारताकडून सौमी पांडेने चार विकेट घेतल्या. तर मुशीर खान आणि राज लिंबानी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर नमन तिवारी आणि अर्शीन कुलकर्णी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
 
टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. अर्शीन कुलकर्णी नऊ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर आदर्शने मुशीरसोबत दुसऱ्या विकेटसाठी 77 चेंडूत 77 धावांची भागीदारी केली. आदर्श 58 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 52 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार उदय सहारनने मुशीरसोबत 87 धावांची भागीदारी केली.
 मुशीर खानने शतक झळकावले. त्याचे या स्पर्धेतील हे दुसरे शतक ठरले. तो सध्या या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने चार सामन्यांच्या चार डावात 81.25 च्या सरासरीने 325 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
 
Edited By- Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती