हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम केला आहे. त्याने 34 धावांच्या खेळीत दोन षटकार मारले. रोहितला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी खेळता आली नाही, पण माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्ट यांचा विक्रम नक्कीच मोडला.
सामन्यातील दोन षटकारांसह रोहित घरच्या मैदानावर वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला. त्याने या बाबतीत धोनीला मागे टाकले. टीम इंडियाच्या माजी कर्णधाराने भारतीय भूमीवर एकदिवसीय सामन्यांमध्ये 123 षटकार ठोकले होते. भारतीय डावाच्या तिसऱ्या षटकात हेन्री शिपलीच्या चेंडूवर षटकार ठोकताना रोहित धोनीच्या पुढे गेला. त्यानंतर त्याने आणखी एक षटकार मारला. भारताच्या भूमीवर रोहितच्या षटकारांची संख्या आता 125 झाली आहे.
हिटमॅन रोहितने वनडेत धावांच्या बाबतीत गिलख्रिस्टला मागे टाकले. हिटमॅनने 9630 धावा केल्या. गिलख्रिस्टने 9619 धावा केल्या. रोहितने 38 चेंडूत 34 धावा केल्या. यादरम्यान त्याने चार चौकार आणि दोन षटकार मारले. रोहितने श्रीलंके विरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत 142 धावा केल्या होत्या. जानेवारी 2020 पासून त्याला वनडेमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. रोहितने जानेवारी २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगळुरूमध्ये शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर त्याने 119 धावांची खेळी खेळली.