फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या प्रभावी कामगिरीमुळे भारताने अ गटातील त्यांच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडवर 44धावांनी विजय मिळवला. गट टप्प्यात भारताची अपराजित मालिका सुरूच राहिली कारण संघाने तिन्ही सामने जिंकून गट अ मध्ये अव्वल स्थान मिळवले. आता 4 मार्च रोजी दुबई येथे होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. ऑस्ट्रेलियन संघाने ग्रुप बी मध्ये दुसरे स्थान पटकावले. दरम्यान, दुसऱ्या उपांत्य फेरीत, न्यूझीलंडचा सामना 5 मार्च रोजी लाहोरमध्ये दक्षिण आफ्रिकेशी होईल.
भारताकडून वरुणने शानदार कामगिरी केली आणि 10 षटकांत 42 धावा देत पाच विकेट्स घेतल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वरुणचा हा पहिलाच सामना होता आणि तो चमक दाखवण्यात यशस्वी झाला. एकेकाळी न्यूझीलंड संघ चांगल्या स्थितीत होता पण वरुणच्या शानदार कामगिरीने भारताच्या बाजूने निकाल लावला. भारताकडून वरुण व्यतिरिक्त कुलदीप यादवने दोन, तर हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.