भारतीय संघ व्यवस्थापनाने, वैद्यकीय कर्मचार्यांशी सल्लामसलत करून, आयपीएलचे बहुतेक सामने खेळलेल्या आणि एकदिवसीय विश्वचषक योजनांमध्ये सहभागी असलेल्या वेगवान गोलंदाजांसाठी वर्कलोड व्यवस्थापन योजना तयार केली आहे. शमीने पहिले दोन कसोटी सामने खेळले असून तो एकदिवसीय संघाचाही भाग आहे. इंदूर कसोटीसाठी त्याच्या जागी उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला होता.
सिराजने पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये फक्त 24 षटके टाकली आहेत आणि 17 ते 22 मार्च दरम्यान खेळल्या जाणाऱ्या तीनही एकदिवसीय सामन्यांसाठी तो प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या कसोटीत त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.
शमी या मालिकेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने दोन सामन्यांमध्ये 30 षटके टाकली असून सात विकेट्स घेतल्या आहेत. मोटेराच्या कोरड्या खेळपट्टीवर संघाला त्याची अधिक गरज भासेल. अशी खेळपट्टी रिव्हर्स स्विंगसाठी पोषक ठरू शकते. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी थेट पात्र होण्यासाठी त्यांना हा सामना जिंकावा लागेल.