IND Vs SA: केपटाऊनमध्ये रोहितच्या सेनेने रचला इतिहास, 31 वर्षांची प्रतीक्षा संपली

गुरूवार, 4 जानेवारी 2024 (17:23 IST)
India vs South Africa Capetown Test: भारतीय संघाने केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवानंतर टीम इंडिया मागे पडली होती. आता 7 विकेट्सने शानदार विजय मिळवत टीम इंडियाने मालिकेतील पराभवापासून स्वतःला वाचवले. भारतीय संघाला ही मालिका जिंकता आली नसली आणि पुन्हा एकदा आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. मात्र केपटाऊनमधील या विजयासह भारताने इतिहास रचला आहे. तसेच केपटाऊनमध्ये केवळ भारतच नाही तर कोणत्याही आशियाई संघाने येथे कसोटी सामन्यात आफ्रिकेचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
केपटाऊनमध्ये तिरंगा फडकवला
1993 नंतर प्रथमच भारतीय संघाला येथे विजय मिळवता आला आहे. म्हणजेच येथील विजयाची तीन दशकांची प्रतीक्षा संपली आहे. भारतीय संघाने 2 जानेवारी 1993 रोजी येथे पहिली कसोटी खेळली आणि ती हरली. तेव्हापासून या संघाने येथे एकूण 6 सामने खेळले असून त्यापैकी चार सामने हारले तर दोन सामने अनिर्णित राहिले. आता सातव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्यांदाच या मैदानावर विजय मिळवला आहे. अशाप्रकारे या मैदानावर तिरंगा फडकवत भारतीय संघाने केपटाऊनची शान मोडून काढत पहिला कसोटी विजय मिळवला.
 
केपटाऊनमध्ये भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी विक्रम
वर्ष 1993 - कसोटी सामना ड्रा
वर्ष 1997 - भारत 282 धावांनी हरला
वर्ष 2007 - भारत 5 विकेटने हरला
वर्ष 2011 - सामना ड्रा
वर्ष 2018- भारत 72 धावांनी हरला
वर्ष 2022- भारत 7 गडी राखून हरला
वर्ष 2024- भारत 7 गडी राखून जिंकला
 
सामन्याची स्थिती काय होती?
या सामन्याबद्दल बोलायचे तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात मोहम्मद सिराजने धुमाकूळ घातला, 15 धावांत 6 बळी घेतले आणि संपूर्ण आफ्रिकन संघ 55 धावांत गडगडला. यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात 153 धावा केल्या आणि 98 धावांची आघाडी घेतली. जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात भारतासाठी आश्चर्यकारक कामगिरी करत 6 विकेट घेतल्या. या डावात आफ्रिकेचा संघ 176 धावांत थांबला. भारतासमोर 79 धावांचे लक्ष्य होते जे 3 विकेट्स गमावून पूर्ण केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती