2021 मध्ये होणार महिला वन डे विश्वचषकाच्या तारखा जाहीर

गुरूवार, 12 मार्च 2020 (16:08 IST)
भारत, पाकिस्तानला खेळावी लागणार पात्रता फेरी   
आगामी 2021 मध्ये होणार्‍या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या तारखा आयसीसीने जाहीर केल्या. न्यूझीलंडमध्ये 6 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधी दरम्यान ही स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार आहेत. त्यात गतविजेते इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, यजमान  न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांना थेट संधी मिळाली आहे. तर भारत पाकिस्तानसह अन्य संघांना पात्रता फेरी खेळून विश्वचषकाचे तिकीट मिळवावे लागणार आहे. महिला चॅम्पिनशीप आणि जुलै महिन्यात श्रीलंकेत होणारी विश्वचषक पात्रता फेरी यानंतर अन्य 4 संघ निश्चित होणार आहेत.
 
6 फेब्रुवारी 2021 पासून सुरू होणार्‍या विश्वचषकात 30 दिवसांत 31 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सामने न्यूझीलंडमधील ऑकलंड, हॅमिल्टन, तौरंगा, वेलिंग्टन, ख्राईस्टचर्च आणि ड्युनडीन या 6 ठिकाणी होणार आहेत. तौरंगा आणि हॅमिल्टनला अनुक्रमे 3 आणि 4 मार्चला उपान्त्य  सामने होतील. तर 7 मार्चला ख्राईस्टचर्च येथे अंतिम सामना प्रकाशझोतात पार पडेल.
 
महत्त्वाचा बदल 
नुकत्याच पार पडलेल्या महिला टी-20 विश्वचषकादरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड संघातील उपान्त्य सामना पावसाच्या व्यत्ययामुळे आणि राखीव दिवस नसल्याने रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार अ गटात अव्वल क्रमांक मिळवणार्‍या भारतीय संघाने थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. त्यानंतर आयसीसीवर काही प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यामुळे या विश्वचषकातील उपान्त्य सामन्यांसाठी आणि अंतिम सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. पुढीलवर्षी होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकासाठी 5.5 मिलियन डॉलर्स इतकी बक्षिसाची रक्कम असणार आहे. या आधी 2017 ला पार पडलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी 3.1 मिलियन डॉलर्स इतकी बक्षिसाची रक्कम होती. या विश्वचषकात सहभागी होणारे 8 संघ राउंड रॉबिन पद्धतीने सामने खेळणार. हे सामने झाल्यानंतर अव्वल 4 संघ उपान्त्य फेरीत प्रवेश करतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती