विजयासाठी षटकामागे सुमारे पाच धावांच्या सरासरीने धावा करण्याचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या श्रीलंकेच्या महिला संघाची सुरुवात चांगली झाली नाही. झूलन गोस्वामीने सलामीवीर हसिनी परेराला केवळ 10 धावांवर तंबूत परतवून भारतीय महिलांना पहिले यश मिळवून दिले. परंतु त्यानंतर निपुणी हंसिका व चमारी अटाप्टटू या जोडीने श्रीलंकेच्या महिलांचा डाव सावरला. मात्र, श्रीलंका संघाला 50 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावांपर्यंत मजल मारता आली.
त्याआधी नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय महिला संघाची सलामीची जोडी केवळ 38 धावा फळकावर असताना परतली होती. याआधी अत्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या स्मृती मंधानाला केवळ 8 धावांवर बाद करून चंडिमा गुणरत्नेने भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर श्रीपाली वीराकोड्डीने पूनम राऊतलाही (16) बाद करून भारताची 2 बाद 38 अशी अवस्था केली.
याच वेळी दीप्ती शर्मा आणि मिताली राज यांची जोडी जमली. या दोघींनी जम बसविण्यासाठी काही वेळ घेतला. पण सूर गवसल्यावर आक्रमक फटकेबाजी करीत तिसऱ्या विकेटसाठी 26 षटकांत 118 धावांची बहुमोल भागीदारी करीत भारताचा डाव सावरला. दीप्तीने 110 चेंडूंत 10 चौकारांसह 78 धावा केल्या. तर मितालीने 78 चेंडूंत 4 चौकारांसह 53 धावांची खेळी केली. अखेर कांचनाने दीप्तीला बाद करून ही जोडी फोडली. झूलन गोस्वामीला बढती देण्याचा प्रयोग अपयशी ठरला. श्रीलंकेची कर्णधार इनोका रणवीराने लागोपाठच्या चेंडूंवर झूलन व मिताली यांना बाद करून भारताची पुन्हा 5 बाद 169 अशी घसरगुंडी घडवून आणली. परंतु वेदा कृष्णमूर्ती (29) आणि हरमनप्रीत कौर (20) यांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करीत भारतीय महिलांना द्विशतकाची मजल मारून दिली. श्रीलंकेकडून श्रीपाली वीराकोड्डीने 28 धावांत 3, तर इनोका रणवीराने 55 धावांत 2 बळी घेतले.