रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला की त्याच्या खेळीतून आणखी काही संदेश दिला आहे?
बुधवार, 26 जून 2024 (00:30 IST)
"जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असलेल्या मिचेल स्टार्कसमोर भारतीय कर्णधाराचा निभाव लागणं खूपच कठीण असेल."ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सुपर 8 च्या शेवटच्या सामन्याआधी टीकाकार आणि जाणकार ही गोष्ट आवर्जून बोलून दाखवत होते.
यामागचं कारण होतं वेगवान गोलंदाजांविरुद्धची रोहित शर्माची कामगिरी. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांकडून टी-20 सामन्यांमध्ये रोहित शर्मा सर्वाधिक म्हणजे 24 वेळा बाद होणं आणि शिवाय त्याची फक्त 22.3 ची सरासरी हे त्यामागचं कारण होतं.सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात सुद्धा रोहित वेगवान गोलंदाजांकडून तीन वेळा बाद झाला होता.
अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीला बोलावलं. विराट कोहली खातंही उघडू शकला नाही. त्यामुळे साहजिकच फलंदाजीचा भार पूर्णपणे कर्णधाराच्या खांद्यावर आला होता.मात्र, रोहित शर्मा हा खमका फलंदाज आहे. त्याने देखील ही संधी गमावली नाही. रोहितनं आपल्या खेळाद्वारे दाखवून दिलं की आता नाही तर पुन्हा कधीच नाही. पारंपारिक पद्धतीनं खेळताना पहिल्या 2 षटकांमध्ये 6 धावा केल्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज हळूहळू धावगती सुधारण्याचा प्रयत्न करायचे.
37 वर्षांच्या रोहित शर्मानं आपल्या खेळातून जगाला दाखवून दिलं की, तो या फॉरमॅटमध्ये शिकण्यासाठी प्रयत्नशील तर आहेच त्याचबरोबर नवीन खेळाडूंप्रमाणे त्याच्यातदेखील भरपूर जोश आहे. तो आजदेखील तितकाच महत्त्वाचा फलंदाज आहे हे दाखवण्याच्या दिशेनं त्यानं पावलं देखील उचलली आहेत.
रोहित शर्माने ही कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध करून दाखवली. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियानंच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विश्वविजेते बनवण्यापासून भारताला रोखलं होतं.
अशी आक्रमक फलंदाजी पाहिली आहे?
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात टी20 फॉरमॅटमध्ये या पद्धतीचा जबरदस्त काऊंटर अटॅक असणारी आक्रमक फलंदाजी याआधी क्वचितच पाहायला मिळाली असेल.
जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असणाऱ्या मिचेल स्टार्कच्या एकाच षटकात रोहित शर्मानं 4 षटकार ठोकत 29 धावा काढल्या.
ज्या गोलंदाजानं आपल्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 4,000 पेक्षा जास्त षटकं टाकताना कधीही आपल्या एका षटकात फलंदाजाला 2 पेक्षा जास्त षटकार मारू दिले नव्हते, त्याच गोलंदाजाला रोहितनं एकाच षटकात चार षटकार ठोकले.
भारतीय क्रिकेट इतिहासात पॉवर-प्ले (सुरूवातीची 6 षटकं) नंतर असं कधीच दिसलं नाही की, 52 धावांमध्ये एका अर्धशतकाचासुद्धा समावेश असेल.
रोहित शर्मानं ही तुफानी कामगिरी फक्त 19 धावांमध्ये केली. हे फक्त त्याच्याच कारकिर्दीतील नव्हे तर सध्याच्या विश्वचषकातील सर्वात वेगवान अर्धशतक आहे.
पॉवर-प्ले सुरू असताना दुसऱ्या टोकाला 13 चेंडूंमध्ये 2 धावा निघाल्या होत्या. ही गोष्ट तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते.
जवळपास दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत अॅडलेडमध्ये इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात रोहित सलामीवीर म्हणून खेळला होता. त्यावेळेस त्यानं संयमानं खेळताना 27 चेंडूंमध्ये 28 धावा काढल्या होत्या.
पराभवानंतर भारताच्या महत्त्वाच्या फलंदाजांवर म्हणजे रोहित शर्मा, के एल राहुल आणि विराट कोहली यांच्या फलंदाजीच्या शैलीवर सडकून टीका झाली होती.
राहुलच्या शैलीत बदल झाला नाही
राहुल हा तरुण खेळाडू आहे. असं असतानाही आंतराष्ट्रीय किक्रेट खेळताना दोन वर्षांत तो आपल्या शैलीत बदल करू शकला नाही.
विराट कोहलीनं मोठं यश मिळवून आणि अनेकवेळा चमकदार कामगिरी करून देखील कळत-नकळत किंवा दबक्या आवाजात त्याच्या धावगती किंवा स्टाइक रेटवर चर्चा होऊ लागते.
मात्र रोहितनं मागील वर्षी विश्वचषकाच्या वेळेस टी20 सलामीवीर म्हणून धडाकेबाज फलंदाजी करण्यास सुरूवात केली होती. त्याच्या या आक्रमक फलंदाजीमुळेच टीम इंडियाला अंतिम सामन्यात धडक सहज प्रवेश करता आला होता.
अहमदाबादमध्ये सुद्धा रोहित शर्मानं आक्रमक फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला घाम फोडला होता. मात्र तो मोठी खेळी उभारू शकला नाही आणि भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवण्याचीच सोमवारी (24 जून) रोहितची इच्छा होती.
सामन्यातील तो एक क्षण
क्रिकेट सामन्यातील काही क्षण असे असतात जे प्रेक्षकांच्या ह्रदयावर कायमचे कोरले जातात. या सामन्यात सुद्धा असा क्षण होता. तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यांच्या गोलंदाजीवर स्लॉग स्वीप करताना मिड विकेटच्या टप्प्यात चेंडू स्टेडिअमच्या थेट छतावर भिरकवण्याचा कमाल क्षण...
इथं ही बाब विसरता येणार नाही की या सामन्याआधी कमिन्सनं लागोपाठ दोन हॅट्रिक घेतल्या होत्या. रोहित फक्त 8 धावांनी आपल्या कारकिर्दीतील एका शानदार आणि अविस्मरणीय शतकास मुकला असेल मात्र संघाच्या विजयामुळे त्याला याची खंत नसेल.
जोपर्यंत रोहित खेळपट्टीवर उभा होता तोपर्यत टीम इंडियानं 10 चौकार आणि 10 षटकार ठोकले होते. रोहित बाद झाल्यानंतर मात्र चौकार आणि षटकारांचा पाऊस थांबला. त्यानंतर मारण्यात आलेल्या चौकार आणि षटकारांची एकत्रित संख्यासुद्धा 10 झाली नव्हती.
मात्र कुलदिप यादवनं 4 षटकांमध्ये फक्त 24 धावा देऊन 2 महत्त्वाचे बळी (मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल) मिळवले नसते तर रोहितनं इतकी अफलातून फलंदाजी केल्यानंतरसुद्धा टीम इंडिया हा सामना हारली असती.
कुलदीपला अक्षर पटेलच्या भेदक गोलंदाजीची साथ मिळाली. अक्षरनं 3 षटकांमध्ये 21 धावा देत धोकादायक अशा मार्कस स्टॉयनिसला बाद केलं.
संघावर जेव्हा सर्वाधिक दबाव होता तेव्हाच रोहितनं कुलदीप आणि अक्षर पटेल यांच्या जोडीला एकाचवेळी गोलंदाजीस उतरवलं.
रोहितचा हुकुमी एक्का
ऑस्ट्रेलियन संघ देखील 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जिद्दीनं खेळत होता. त्यांनी 11 षटकांमध्ये 116 धावा केल्या होत्या आणि त्यांचे फक्त 2 गडी बाद झाले होते.
मॅक्सवेलनं आक्रमक फलंदाजी करताना रविंद्र जडेजासारख्या अनुभवी गोलंदाजाच्या एका षटकात तीन चौकार ठोकून जडेजाच्या गोलंदाजी धार बोथट करून टाकली होती.
अशावेळी रोहितसमोर एकच पर्याय होता तो म्हणजे त्याचा एक्का अर्थात जसप्रीत बुमराह. कारण जसप्रीत कडून त्यानं आधी 2 षटकं गोलंदाजी करून घेतली होती. त्यामुळे शेवटच्या षटकांसाठी त्याला जसप्रीतची गोलंदाजी बाकी ठेवायची होती.
12 ते 15 षटकांदरम्यान कुलदीप-पटेल यांच्या जोडीनं 4 षटकांमध्ये फक्त 25 धावा ऑस्ट्रेलियाच्या संघावर चांगलाच दबाव निर्माण केला. परिणामी ऑस्ट्रेलियाला आपले दोन गडी गमवावे लागले.
रोहितच्या 92 धावांच्या तडाखेबंद खेळीबरोबरच गोलंदाजीच्या या भागीदारीला सुद्धा सामन्याचा टर्निंग पॉइंट म्हटलं जाऊ शकतं.
इतर अनेक खेळाडूंची कामगिरी देखील महत्त्वाची होती.
मात्रा आता पुढील दोन सामन्यांमध्ये देखील कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडिया आपल्या आक्रमक खेळाची धार अशीच ठेवू शकतील का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.