मालिकेतील तीन पैकी दोन सामन्यात भारतीय संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. आता इंग्लंडविरुद्ध भारताला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. आतापर्यंत ज्या संघाने नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग केला आहे त्यांना विजय मिळवता आला. भारताचा कर्णधार विराट कोहली चांगली कामगिरी करण्यावर भर देत असतो. पण आगामी टी-20 विश्वचषकाचा विचार करता लक्ष्याचा पाठलाग असो वा प्रथम फलंदाजी दोन्ही वेळा चांगली कामगिरी करून विजय मिळवणे गरजेचे आहे.
भारतीय संघाचा ज्या दोन लढतीत पराभव झाला त्या दोन्ही लढतीत संघाला पॉवर प्लेमध्ये धावा करता आल्या नाहीत. ज्याचा परिणाम अंतिम धावसंख्येवर झाला. या दोन्ही लढतीत अनुक्रमे श्रेयस अय्यर व विराट कोहली यांच्या फलंदाजीमुळे भारत धावा करू शकला. के. एल. राहुलच्या खराब फलंदाजीचा तोटा भारतीय संघाला झाला. पण विराट कोहलीने तोच सलामीचा फलंदाज असेल, असे स्पष्ट केले आहे.