धोनीसमोर मोठे आर्थिक संकट ?

सोमवार, 18 जून 2018 (17:23 IST)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या एका अडचणीत सापडला आहे. काही वर्षांपूर्वी धोनीने रांचीमध्ये संपत्ती विकत घेतली होती. धोनीच्या याच संपत्तीचा लिलाव होण्याची शक्यता आहे, असे झाले तर धोनीला फार मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे धोनीसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे.
 
काही वर्षांपूर्वी महेंद्रसिंह धोनीने रांचीमधील डोरंड येथे शिवम प्लाझा नावाच्या इमारतीमध्ये तीन मजले विकत घेतले होते. या इमारतीचे बांधकाम दुर्गा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने केले आहे. हे प्राजेक्ट पूर्ण करण्यासाठी दुर्गा डेव्हलपर्सने हुडकोकडून १२ कोटी ९५ लाखांचे कर्ज घेतले होते. परंतु, हे कर्ज चूकवू न शकल्यामुळे दुर्गा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडला कर्ज देणाऱ्या हुडकोने या संपूर्ण इमारतीचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. इमारतीच्या नियोजित आराखड्यानुसार, दुर्गा डेव्हलपर्सने १० मजल्यांची इमारत बांधणे अपेक्षित होते. पण काम सुरू असतानाच दुर्गा डेव्हलपर्स आणि जमिनीचे मालक यांच्यामध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हुडकोने कर्जाच्या एकूण रक्कमेपैकी ६ कोटी रूपये दिल्यानंतर उर्वरित रक्कम रोखून धरली. यामुळे इमारतीचे फक्त सहाच मजले पूर्ण होऊ शकले. तसेच कर्जाचे बफ्ते थकल्यामुळे हुडकोने दुर्गा डेव्हलपर्सला दिवाळखोर घोषित केले असून त्यांनी आता कर्ज वसुलीसाठी या इमारतीचा लिलाव करण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या दुर्गा डेव्हलपर्स आणि हुडको यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईमध्ये धोनीचे कोट्यावधी रूपये अडकलेले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती