ऑस्ट्रेलियाने चार तासात उडवला टीम इंडियाचा धुव्वा; 10 विकेट्सनी दणदणीत विजय

रविवार, 19 मार्च 2023 (17:53 IST)
मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड या जोडीच्या बिनबाद शतकी भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वनडेत भारतावर 10 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी मिळालेल्या 118 धावांचा पाठलाग करताना हेड-मार्श जोडीने भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. मार्शने 66 तर हेडने 51 धावांची खेळी केली. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-1 बरोबरी केली आहे. स्टार्कला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
पावसामुळे ओलसर खेळपट्टीचा फायदा उठवत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला अवघ्या 117 धावातच गुंडाळलं. 5 विकेट्स पटकावणारा मिचेल स्टार्क भारतासाठी कर्दनकाळ ठरला. शॉन अबॉटने 3 तर नॅथन एलिसने 2 विकेट्स घेत स्टार्कला चांगली साथ दिली.
 
वनडेत डावात पाच विकेट्स घेण्याची स्टार्कची ही नववी वेळ आहे. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांसमोर शरणागती पत्करण्याची भारतीय फलंदाजांची परंपरा या लढतीतही सुरूच राहिली.
वनडेत द्विशतक नावावर असणाऱ्या शुबमन गिलला या लढतीत भोपळाही फोडता आला नाही. मिचेल स्टार्कने त्याला बाद केलं. काही देखणे फटके लगावत कर्णधार रोहित शर्माने चांगली सुरुवात केली. पण उजव्या यष्टीबाहेरचा चेंडू खेळण्याचा रोहितचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या हातात जाऊन विसावला.
 
ट्वेन्टी20 जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सूर्यकुमार यादवसाठी वनडे क्रिकेट अजूनही कठीण असल्याचं सिद्ध झालं. मिचेल स्टार्कने त्याला पायचीत केलं. त्यालाही भोपळा फोडता आला नाही. पहिल्या लढतीत झुंजार अर्धशतकी खेळी करणाऱ्या के.एल.राहुलला स्टार्कनेच पायचीत करत भारताच्या डावाला खिंडारच पाडलं.
शॉन अबॉटच्या गोलंदाजीवर हार्दिक पंड्याचा स्टीव्हन स्मिथने अफलातून झेल टिपला. भरवशाच्या आणि अनुभवी विराट कोहलीकडून भारताला अपेक्षा होत्या. खेळपट्टीवर कोहली स्थिरावलाही होता. पण नॅथन एलिसच्या अचूक अशा चेंडूवर कोहली पायचीत झाला. त्याने 31 धावांची खेळी केली. रवींद्र जडेजाने 16 धावा करत स्थिरावण्याचा प्रयत्न केला पण एलिसने त्यालाही तंबूत धाडलं.
 
शॉन अबॉटने लागोपाठच्या चेंडूंवर कुलदीप यादव आणि मोहम्मद शमीला माघारी धाडलं. अक्षर पटेलने एक चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 29 धावांची खेळी केली. स्टार्कने शमीला त्रिफळाचीत करत डावात पाच विकेट्स घेण्याची किमया केली. स्टार्कने 53 धावांच्या मोबदल्यात भारताचा निम्मा संघ तंबूत धाडला.
 
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विशाखापट्टणम परिसरात पाऊस झाला होता. सामन्याच्या दिवशीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र उघडीप मिळाल्याने सामना वेळेवर सुरू करण्याचा पंचांनी निर्णय घेतला.
 
कौटुंबिक कारणांमुळे पहिल्या वनडेत खेळू न शकलेला कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात संघात परतला. शार्दूल ठाकूरच्या जागी अक्षर पटेलला संधी देण्यात आली.
 
अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा असे तीन डावखुरे फिरकीपटू भारताच्या अंतिम अकराचा भाग आहेत.
 
मुंबईत झालेल्या पहिल्या वनडेतही भारतीय संघाने संघर्ष करुन विजय मिळवला होता.

Published By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती